सरकारने २४ तासांत नाव बदलले

पणजी : गोव्यात (Goa) तिसऱ्या जिल्ह्याचे (Third District) नाव अटल असे ठेवण्यासंदर्भात निर्णय झाला होता. मात्र, अटल (Atal) नावावरून सरकारवर चौफेर टीका सुरू झाल्यानंतर २४ तासांत नाव बदलून सरकारने तिसऱ्या जिल्ह्याचे नाव आता कुशावती (Kushavati) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात तिसरा जिल्हा स्थापन करण्यावर काल मंगळवारी सर्वपक्षीय बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. नवीन जिल्ह्याचे नाव ‘अटल’ असेल व त्याचे मुख्यालय केपेत असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बैठकीनंतर दिली होती. मात्र, अटल नाव देण्यावरून सरकारवर चौफेर टिका होऊ लागली. त्यानंतर सरकारने आता कुशावती हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. केपेतून वाहत असलेल्या कुशावती नदीवरून हे नाव देण्यात येणार आहे. नवीन स्थापन होणाऱ्या जिल्ह्यात सांगे, काणकोण, केपे, धारबांदोडा या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, आता कुशावती नाव निश्चित होते की, त्यातही बदल होऊन आणखी काही नाव दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.