५ जानेवारी पर्यंत निर्णय न बदलल्यास आंदोलन; तुये हॉस्पिटल कृती समितीचा लेखी स्वरूपात इशारा

पेडणे : गोव्यातील (Goa) तुये येथे १०० खाटांच्या क्षमतेची नवीन हॉस्पिटल इमारत (Hospital Building) उभारण्यात आली आहे. त्या हॉस्पिटलमध्ये तुये सामुदायिक केंद्र स्थलांतरित करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. ५ जानेवारी पर्यंत सरकारने फेरविचार करून हे हॉस्पिटल बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला (Goa Medical College) लिंक हॉस्पिटल करावे. अन्यथा १२ जानेवारीपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा तुये हॉस्पिटल कृती समितीने दिला आहे.
यासंदर्भात लेखी निवेदन आरोग्य अधिकारी (Health Officer) व संबंधितांना दिले आहे. यावेळी तुये हॉस्पिटल कृती समितीचे जॉर्ज लोबो, देवेंद्र प्रभू देसाई, अॅड. प्रसाद शहापूरकर, पेडणे तालुका विकास समितीचे निमंत्रक व्यंकटेश नाईक, पंच निलेश कांदोळकर आदी उपस्थित होते.
यासंदर्भात माहिती देताना देवेंद्र प्रभु देसाई व इतरांनी सांगितले की, ज्या उद्देशाने या हॉस्पिटलची इमारत उभारली होती. ते लिंक हॉस्पिटल सुरू करावे. जर सरकारने सामुदायिक तुये आरोग्य केंद्र यामध्ये स्थलांतरित केले तर आमचा त्याला तीव्र विरोध असणार आहे. परंतु अजूनही लिंक हॉस्पिटल सुरू केले नसल्याने तुये सामुदायिक आरोग्य केंद्र या ८० कोटींच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध असणार आहे.
त्यासाठी आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात निवेदन सादर केले आहे, या नवीन हॉस्पिटल मध्ये ओपीडी फार्मसी लॅबोरेटरी हे विभाग स्थलांतरित करून सरकार जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप देवेंद्र प्रभुदेसाई यांनी केला, शंभर खाटांचे तुये हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक व्हावे; यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या पुढाकाराने ही इमारत उभारण्यात आली. त्याच इमारतीत तुये हॉस्पिटल शिफ्ट करू देणार नसल्याचे देवेंद्र प्रभुदेसाई व इतरांनी सांगितले.