'रेन्ट अ बाईक' व्यवसायातील वादातून दोघांत जुंपले; एकाने दुसऱ्याच्या कानाचे लचकेच तोडले!

म्हापसा बस स्थानकावरील घटना. जखमीवर उपचार सुरू, संशयिताला अटक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
'रेन्ट अ बाईक' व्यवसायातील वादातून दोघांत जुंपले; एकाने दुसऱ्याच्या कानाचे लचकेच तोडले!

म्हापसा: म्हापसा येथील कदंब बस स्थानकावर 'रेन्ट अ बाईक' व्यवसायातील वादातून एका तरुणाच्या कानाचा चावा घेऊन त्याचा तुकडा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हिंसक घटनेत नितेश दत्ताराम खानोळकर (४३, रा. बस्तोडा) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपी समीर पेडणेकर (रा. खोर्ली, म्हापसा) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी, ३० डिसेंबर रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास घडली. जखमी नितेश आणि संशयित समीर हे दोघेही म्हापसा बस स्थानक परिसरात दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. मी म्हापशाचा रहिवासी असून केवळ आम्हालाच येथे व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, असे म्हणत संशयित समीर हा नितेश यांच्या व्यवसायात वारंवार अडथळा निर्माण करत होता. या स्थानिक आणि बाहेरील रहिवासी अशा वादातून दोघांमध्ये अनेकदा खटके उडत होते.

घटनेच्या दिवशी हा वाद विकोपाला गेला आणि दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. संतापाच्या भरात समीर पेडणेकरने नितेश खानोळकर यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या डाव्या कानाचा चावा घेतला. हा चावा इतका जोरात होता की, नितेश यांच्या कानाचा तुकडा थेट तुटून संशयिताच्या तोंडात आला. या हल्ल्यात नितेश रक्तबंबाळ होऊन कोसळले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले.

जखमीचे भाऊ नरेश खानोळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये (११०, ११८(२), ३५२ आणि ३५१(३)) गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंढरी चोपडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा