पर्ये भूमिका देवस्थानात तणाव, बोडगेश्वर जत्रेत पोलिसांवरील सुरी हल्ला चर्चेचा विषय

साप्ताहिकी : अपघात, आग, फसवणूक, मारहाण घटनांनी गाजला आठवडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th January, 11:58 pm
पर्ये भूमिका देवस्थानात तणाव, बोडगेश्वर जत्रेत पोलिसांवरील सुरी हल्ला चर्चेचा विषय

पणजी : राज्यात मागील आठवड्यात अपघात, आग, फसवणूक, मारहाण आदी घटनांनी आठवडा गाजला. यासाेबतच अमली पदार्थांच्या घटनांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे लक्षात आले. तसेच धारबांदोडा शाळेतील शिपायाकडून मुलांना मारहाण, पर्ये भूमिका देवस्थानात तणाव, बोडगेश्वर देवाच्या जत्रोत्सवात पोलिसांवर झालेला सुरी हल्ला, सोनसडो यार्डातील कचऱ्याला लागलेली आग आदी घटना आठवडाभर चर्चेचा विषय राहिल्या. याशिवाय स्वतःच्याच पाच महिन्यांच्या चिमुकलीचा आईने केलेली हत्या, फातोर्डा येथील महिलेची झालेली फसवणूक यासारख्या गुुन्हेगारी घटनाही घडल्या.


रविवार

* धारबांदोडा येथे मुलांना मारहाण; शाळेच्या शिपायाला अटक
धारबांदोडा तालुक्यातील एका हायस्कूलच्या शिपायाने रविवारी दुपारी मैदानावर खेळणाऱ्या ४ मुलांना जबर मारहाण केली. दोन मुलांच्या सायकलींची मोडतोड केली. दरम्यान, जखमी मुलांना इस्पितळात उपचार करून घरी पाठविण्यात आले. फोंडा पोलिसांनी हायस्कूलचे शिपाई प्रेमानंद शंकर गावडे (५४, मूळ धारबांदोडा, सध्या रा. फोंडा) याला अटक केली आहे.


कारच्या धडकेने जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू
कळंगुट येथे गतिरोधकामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध दिशेने जात असलेल्या दुचाकीला कारची धडक बसली. अपघातातील जखमी दुचाकीस्वार किशोर रावजी हळदणकर (५६, रा. सावतावाडा, कळंगुट) यांचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी विजय शॉ (३७, रा. मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोमवार
चिकनचा कचरा नाल्यात; टेम्पोचालकाला अटक
एसजीपीडीए मार्केटमधील चिकनचा व इतर मांसाचा कचरा गाडीतून आणून मडगाव रिंगरोड येथील नाल्यात टाकताना टेम्पोचालकाला नागरिकांनी पकडले. त्यानंतर स्थानिकांनी सदर माहिती फातोर्डा पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर वाहनाची पाहणी करून टेम्पोचालक सुनील पुजारी याची चौकशी करून त्याला अटक करण्यात आली.


प्रश्नाला शंभर रुपये घेण्याचा निर्णय गोवा बोर्डाकडून मागे
दहावी आणि बारावीच्या पेपर फेरतपासणीसाठी प्रत्येक प्रश्नाला शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेत यंदा पेपर फेरतपासणीची पूर्वीचीच पद्धत म्हणजे संपूर्ण पेपरसाठी ७०० रुपयांचे शुल्क घेणार असल्याचे बोर्डाचे सचिव विद्यादत्त नाईक यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

मंगळवार



मडगावातील २१ आस्थापने ‘प्रदूषण नियंत्रण’कडून सील
सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याप्रकरणी नोटीसा देऊनही ते बंद न करणाऱ्या ४६ आस्थापनांना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मडगावातील २१ आस्थापनांना सील केले आहे.


राज्यातील आणखी सहा वस्तूंना लवकरच जीआय मानांकन  !
गोव्यातील कोरगुट तांदूळ, मुसराद आणि मांगेलाल आंबा, कोकोनट क्राफ्ट, ताळगावची वांगी आणि काजू अॅप्पल या आणखी सहा वस्तूंना पुढील चार ते पाच महिन्यांत जीआय मानांकन मिळणार असल्याची माहिती विज्ञान-तंत्रज्ञान मंडळाचे अधिकारी दीपक परब यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
बुधवार



पर्ये भूमिका देवस्थानात तणाव; ३८ जणांवर गुन्हे
पर्येतील श्री भूमिका देवीच्या गावकर, राणे व माजिक या महाजन गटांमध्ये धार्मिक हक्कावरून बुधवारी देवीचा पारंपरिक कालोत्सव साजरा करण्यावरून अचानक वाद उफाळून आला. यावेळी दगडफेक व हाणामारी झाली. यात गावकर, राणे व माजिक या तिन्ही गटांचे २५ हून अधिक लोक जखमी झाले. १५हून अधिक पोलिसांनाही दुखापत झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले. रात्री उ‌शिरा पोलिसांनी ३८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.


बोडगेश्वर जत्रेत माथेफिरूचा तीन पोलिसांवर सुरीहल्ला
श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवस्थळी माथेफिरूने तिघा पोलिसांवर सुरी हल्ला केला. गंभीर जखमी दोघांवर गोमेकॉत, तर एकावर म्हापशातील जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये शरद हरजी (कळंगुट पोलीस स्थानक), रितेश महाले (हणजूण पोलीस स्थानक) व विठ्ठल नारोजी (पणजी पोलीस स्थानक) या कॉन्स्टेबलांचा समावेश आहे. पोलिसांनी हल्लेखार संशयित आयुश मनोज नाईक (रा. कळंगुट) याला अटक केली आहे.
गुरुवार

सोनसडो यार्डातील कचऱ्याला भीषण आग
मडगाव सोनसडो यार्डातील कचऱ्याला गुरुवारी सकाळी आग लागण्याची घटना घडली. मडगाव अग्निशामक दलाने आग नियंत्रणात आणली. आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, ही आग कचऱ्याच्या वरील भागातून लागलेली असल्याने कोणीतरी आग लावलेली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शुक्रवार



चिमुकलीच्या खून प्रकरणी मातेला जन्मठेप
२०२२ मध्ये स्वतःच्याच पाच महिन्यांच्या चिमुकलीचा आईने लाटणीच्या साहाय्याने खून केला होता. या प्रकरणी बाल न्यायालयाने आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला जन्मठेप आणि १.१० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा आदेश बाल न्यायालयाच्या अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी १४ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता.
शनिवार


फातोर्डातील महिलेची २.२ लाखांची फसवणूक, मुंबईतून दोघांना अटक
फोटो : Money-Fraud
फातोर्डा येथील महिलेला व्हॉटसअप कॉल करून पोलीस असल्याचे सांगत मनी लाॅड्रिंग प्रकरणात आपला सहभाग असून यातून सुटकेसाठी २.२० लाख रुपये घेण्यात आले होते. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अमित वाघेला व फैझल शेख या दोघा संशयितांना मुंबईतून अटक करण्यात आली असून दोन्ही संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लक्षवेधी
- गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) हरमल येथील ओम लेक रेस्टॉरंट पार्किंग परिसरात छापा टाकून तोशी मासाओ निव्हा (४४, जपान) आणि फ्लोरियन पीटर क्रिस्ट (३४, जर्मनी) या दोघा विदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम चरस जप्त केले आहे.
- कुचेली-म्हापसा येथे साईबाबा मंदिराजवळ गवताला लावलेल्या आगीत प्रवासी बस जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.
- कोरगाव पंचायत क्षेत्रातील गावडेवाडा-भटवाडी येथील वयोवृद्ध बागायतदार सावित्री गावडे यांच्या मालकीच्या जागेतील २८ पोफळी आणि दोन कवाथे अज्ञात नागरिकांनी कापून टाकल्याची तक्रार सावित्री गावडे यांनी केली आहे.
- माहिती हक्क कायद्याखाली (आरटीआय) मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवृत्त प्राचार्यांना माहिती आयोगाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड वसूल करण्याची जबाबदारी तांत्रिक शिक्षण संचालनालयाकडे सोपवण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह आहारासाठीचे दर सरकारने वाढवले आहेत. त्यामुळे माध्यान्ह आहार तयार करणाऱ्या स्वयंसाहाय्य गट तसेच पालक-शिक्षक संघांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा