दामू नाईक भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांच्याकडून घोषणा
पणजी : प्रदेश भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्षच आहे. या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी काळात पक्षाचे संघटन आणखी वाढवू आणि आगामी सर्वच निवडणुका जिंकू, असा ठाम विश्वास भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला.
गोमंतक मराठा समाजाच्या पणजीतील सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांनी दामू नाईक यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार तथा मावळते प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर, सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांच्यासह पक्षाचे इतर नेते, मंत्री, आमदार उपस्थित होते.
आतापर्यंत भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेल्या प्रत्येक नेत्याने पक्षाला राज्यात बळकटी मिळवून दिलेली आहे. त्याच पद्धतीने आगामी काळात प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन आणखी वाढू. नवनवे कार्यकर्ते तयार करू आणि आगामी काळातील जिल्हा पंचायत, पालिका आाणि विधानसभा निवडणुकही भरघोस मतांनी जिंकू, असे दामू नाईक म्हणाले. जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची निवड होणे हा माझ्या आयुष्यातील फार मोठा आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले.