हल्लेखोर ठाण्यातील बारमध्ये हाऊसकीपिंगचे काम करायचा. त्याच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत. पाच सहा महिन्यापूर्वी त्याने बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केल्याची माहितीही समोर आली आहे, एकूणच प्रकाराच्या खोलवर जाण्यासाठी विविध तपास पथकांनी तपासचक्रास गती दिली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. हल्ल्याचे बांगलादेश कनेक्शन समोर आले आहे. आरोपीला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय आहे.
मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आरोपीचे नाव आहे. तो ३० वर्षांचा आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपी सैफच्या घरात घुसला होता. यानेच १६ जानेवारीच्या रात्री घरात घुसून सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता. तपास आणि खोलवर चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणा आणि पोलिसांनी याबाबत अधिकृत पुष्टी केली आहे. सध्या आरोपीची खार पोलीस स्थानकात विविध तपास पथकांकडून चौकशी सुरू आहे.
शहजाद हा अवैध घुसखोर असल्याचा संशय आहे. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने अनेक नावे बदलली. आरोपी पाच-सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. पकडल्यानंतर सुरुवातीला त्याने आपले नाव विजय दास असल्याचा बनाव आणला. पण कोणतीही वैध कागदपत्रे तो दाखवू शकला नाही. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपले नाव उघड केले. विशेष म्हणजे तो भारताचा रहिवासी नाही. मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याला ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून अटक केली आहे. आरोपी ठाण्यातील रिकीज बारमध्ये हाऊसकीपिंगचे काम करायचा. हल्लेखोराला अटक करण्यापूर्वी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले पायऱ्या उतरतानाचे त्याच्या फोटोचे पोस्टर्स मुंबई आणि आसपासच्या ठिकाणी लावण्यात आले होते. सध्या एकूणच प्रकाराच्या खोलवर जाण्यासाठी विविध तपास पथकांनी तपासचक्रास गती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज रविवार १९ जानेवारी रोजी ११ वाजेपर्यंत न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे डीसीपी गेडाम यांनी सांगितले.
दरम्यान, याआधी शनिवारी या हल्ल्याशी संबंधित एका संशयिताला छत्तीसगडमधील दुर्ग येथून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी मुंबईतूनही दोघांना ताब्यात घेतले होते. शनिवारी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने दुर्ग, छत्तीसगड येथून ताब्यात घेतलेल्या संशयिताचे छायाचित्रही शेअर केले आहे. त्याचे नाव आकाश असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने स्वत: मुंबईचा रहिवासी असल्याचे म्हटले होते. मुंबई पोलिसांचे पथक दुर्ग येथे पोहोचून संशयिताची चौकशी करेल.