प्रयागराज : महाकुंभ मेळ्याचा आज सहावा दिवस आहे. सकाळी १० वाजेपर्यंत २० लाख भाविकांनी स्नान केले. आतापर्यंत १६.९ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. दरम्यान प्रयागराजमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची धमकी मिळताच, टास्क फोर्स आणि इतर यंत्रणांनी तत्परतेने कार्य करत मेळ्यामध्ये फिरणाऱ्या तब्बल १८८ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सेक्टर-१८ मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा रात्री उशिरापर्यंत चिंतेत होत्या. पोलीस, श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकाने सेक्टर-१८सह महाकुंभ परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र कुठेही काहीही सापडले नाही. सफाई कामगाराला दुपारी सेक्टर-१८ मध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला होता. काही वेळातच स्फोट होण्याची भीती होती. पोलीस कॉल डिटेल्स काढत आहेत.
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रयागराजला येत आहेत. येथे लष्कराच्या अधिकाऱ्यांची व इतर तपास यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत.राजनाथ सिंह यांच्या आगमनापूर्वी लष्कराचे जवान रात्री उशिरा शहर आणि महाकुंभ परिसरात दाखल झाले. पोलिसांनीही तपास वाढवला. जत्रा परिसरात जाणाऱ्या वाहनांची झडती घेतली. १८ संशयितांना अटक करण्यात आली. त्यातील काहींकडे आधार कार्ड नव्हते. काहींना स्वतःबद्दल योग्य माहिती देता आली नाही. तर अनेक तरुणांना चोरीच्या संशयावरून पकडण्यात आले.