युरोप : प्रवाशांना समुद्रामार्गे अवैधरित्या स्पेनमध्ये घेऊन जाणारी बोट उलटली, ५०हून जास्त ठार

मोरोक्कोजवळ असलेल्या अटलांटिक महासागरामार्गे बेकायदेशीरपणे स्पेनमध्ये घुसखोरी करण्याचा या सर्वांचा प्लान होता. मृतांत ४४ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th January, 01:52 pm
युरोप : प्रवाशांना समुद्रामार्गे अवैधरित्या स्पेनमध्ये घेऊन जाणारी बोट उलटली, ५०हून जास्त ठार

इस्लामाबाद : समुद्रामार्गे  बेकायदेशीरपणे युरोपला जाणाऱ्या ४४ पाकिस्तानी नागरिकांचा अटलांटिक महासागरात बुडून मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेतून स्पेनला जाणारी एक बोट मोरोक्कोमधील डाखला बंदराजवळ बुडाली. बोटीवर ८० हून अधिक लोक होते. यामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात बहुतांश पाकिस्तानी आहेत. वृत्तानुसार, प्रवासादरम्यान लोकांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता झाले होते. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ते सापडले नाही.




पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मानवी तस्करी रोखण्यासाठी पावले उचलण्याबाबत कडक धोरणांची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अधिकाऱ्यांकडून घटनेचा अहवाल मागितला आणि मानवी तस्करीच्या घृणास्पद कृत्यामध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.मोरोक्कोजवळ असलेल्या अटलांटिक महासागरामार्गे बेकायदेशीरपणे स्पेनमध्ये घुसखोरी करण्याचा या सर्वांचा  प्लान होता.  मृतांत ४४ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश.  




पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटल्यानुसार, मोरोक्कोमधील दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.अनेक लोकांना वाचवण्यात यश आले असून डाखला बंदराजवळच्या छावणीत त्यांना ठेवण्यात आले आहे. ही बोट २  जानेवारी रोजी ८६ प्रवासी घेऊन मॉरिशसहून निघाली होती. या स्थलांतरितांमध्ये ६६ पाकिस्तानींचाही समावेश होता. वॉकिंग बॉर्डर्सच्या सीईओने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, सध्या बुडालेल्यांपैकी ४४ लोक पाकिस्तानचे आहेत.

बोट उलटण्याच्या घटनेच्या एक दिवस आधी याच बंदरानजीक  असाच अपघात घडला होता. मोरक्कनच्या अधिकाऱ्यांनी एका दिवसापूर्वीच एका बुडालेल्या बोटीतून ३६ जणांची सुटका केली होती.