लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल : मुंबई पोलीस
मुंबई : बुधवारी १६ जानेवारी रात्री सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील खार भागात एका चोरट्याने त्याच्या घरात घुसून चाकूने हल्ला केला. ही घटना रात्री २ च्या सुमारास घडली. तेव्हा सैफ अली खान त्याच्या घरी उपस्थित होता. या हल्ल्यात अभिनेत्याच्या अंगावर ६ चाकूचे वार करण्यात आले. त्याला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या वृत्ताने त्याच्या चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
डॉ लीना आणि डॉ नितीन डांगे सैफवर उपचार करत असल्याचे लीलावती हॉस्पिटलने म्हटले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सैफची प्रकृती स्थिर आहे, पण जखमा खोल आहेत आणि बरे होण्यास वेळ लागेल. पुढील काही दिवस त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.
रुग्णालयाच्या माहितीनुसार, सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. गंभीर अवस्थेत सैफला पहाटे ३ वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले, येथे डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली. रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितल्यानुसार, सैफवर सहा वेळा वार करण्यात आले होते, त्यापैकी दोन जखमा खोल होत्या. यातील एक त्याच्या पाठीच्या कण्याजवळ आहे.
ही घटना खारच्या फॉर्च्युन हाईट्समध्ये घडली. ही एक उच्च सुरक्षा असलेल्या सोसायटी आहे. एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही हल्लेखोर आतमध्ये कसे घुसले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच घटनेनंतर तेथून पळून जाण्यात तो कसा यशस्वी झाला. या सर्व मुद्यांवर पोलीस तपास करत आहेत. सैफच्या टीमने चाहत्यांना प्रायव्हसी जपण्याची विनंती केली आहे.
हल्लेखोर सैफ अली खानच्या घरात कसं घुसला असावा ? याबाबत दोन थिअरी समोर आल्या आहेत. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे ऍक्टीआयच्या पथकाने सांगितले. या हल्ल्यात सैफचा एक कर्मचारीही जखमी झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी, पोलिसांचे म्हणणे आहे की हल्लेखोराचा सैफच्या मोलकरणीशी वाद झाला, त्यानंतर सैफने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितले. मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यात काही परस्पर संबंध होते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या घटनेचे अनेक पैलू अजूनही अस्पष्ट आहेत. हल्लेखोर काही योजना घेऊन आला होता का? मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यातील वादाचे खरे कारण काय होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. घरातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. मुंबई पोलिसांनी सैफच्या घराभोवती कडक बंदोबस्त ठेवला आहे.
हल्ल्याच्या वेळी अभिनेत्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर कुठे होती याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती नाही. तथापि, करीना कपूरची बहीण करिश्मा कपूरने हल्ल्याच्या काही तास आधी तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये करीना तिच्या गर्ल गँगसोबत एका डिनर पार्टीमध्ये दिसली होती. हल्ल्याच्या वेळी करीना तिच्या मैत्रिणींसोबत होती की घरी परतली होती हे अद्याप निश्चित झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.