मेकॅनिकची प्रकृती गंभीर. गोमेकॉत उपचार सुरू
फोंडा: केळीनी - उसगाव येथे रंग कामासाठी ठेवलेल्या वाहनाच्या कामाचे पाचशे रुपये कमी दिल्याने मेकॅनिक अशोककुमार बाबाजी सेटी (५५, सध्या राहणारा उसगाव, मुळ ओरिसा) व किशन सनगावकर (५३,तिस्क उसगाव) यांच्यात रविवारी संध्याकाळी वाद निर्माण झाला. वडिलांशी वाद केल्यामुळे संतप्त बनलेल्या कुणाल सनगावकर (२५)याने रागाच्या भरात मेकॅनिकच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. जखमी झालेला मेकॅनिकवर गोमेकॉत उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर बनल्याचे समोर आले आहे. फोंडा पोलिसांनी पिता व पुत्राला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशन सनगावकर याने काही दिवसापूर्वी मडगाव येथील एक टेम्पो गॅरेजमध्ये रंग कामासाठी ठेवली होती. त्यावेळी ५ हजार रुपयात रंगकाम करून देण्याचे ठरले होते. पण रविवारी किशन सनगावकर संध्याकाळी यांनी मेकॅनिकला फक्त साडेचार हजार रुपये रंगकामाचे दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. मेकॅनिकने पाचशे रुपये आणखीन देण्याची मागणी केली, पण किशन यांनी देणार नाही असे ठणकावले. त्यावेळी तिस्क -उसगाव येथे गेलेल्या कुणाल सनगावकर याने आपल्या वडिलांना फोन केला. यावेळी मेकॅनिक पाचशे रुपयासाठी वाद करीत असल्याचे त्यांनी आपल्या मुलाला सांगितले. संतप्त बनलेल्या कुणाल सांगावकर याने त्वरित गॅरेजमध्ये धाव घेतली.
त्यावेळी गॅरेज मध्ये असलेल्या लोखंडी रॉडने मेकॅनिकच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या मेकॅनिकला त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर जखमीची प्रकृती गंभीर बनल्याने आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी गोमेकॉत पाठवून दिले. घटनेची माहिती मिळतात फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.