अस्तित्त्वात नसलेल्या हॉटेल्सच्या नावे वेबसाईटवरुन बुकिंग घेत पर्यटकांची फसवणूक

गोवा पोलिसांनी उघड केला घोटाळा; चौघांना घेतले ताब्यात.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
20th January, 05:14 pm
अस्तित्त्वात नसलेल्या हॉटेल्सच्या नावे वेबसाईटवरुन बुकिंग घेत पर्यटकांची फसवणूक

पणजीः २०२२ पासून विविध संकेतस्थळांवर अस्तित्त्वातच नसलेल्या हॉटेल्सची माहिती आणि फोटो वापरुन बुकिंग घेत अनेक पर्यटकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सिंडिकेटचा गोवा पोलिसांनी  पर्दाफाश केला. याप्रकरणी गोवा पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करत एकास ग्वाल्हेर येथून तिघांना हैदराबाद येथून ताब्यात घेत गोव्यात आणून अटक केली. 

या प्रकरणी सखोल तपास सुरू असून, एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा घोटाळा असू शकतो अशी शक्यता उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले. पणजी पोलीस मुख्यालयात या प्रकरणासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयपीएस अधिकारी मयंक दुबे आणि अरुण बलगोत्रा हजर होते  

संशयित स्वतः हॉटेल मालक असल्याचे भासवत अस्तित्त्वात नसलेल्या हॉटेल्सचे फोटो आणि माहिती बुकिंग डॉट कॉम सारख्या अधिकृत वेबसाईट्सवर टाकत. इतर हॉटेल्स आणि बंगल्यांच्या तुलनेत या संशयितांनी लिस्ट केलेल्या हॉटेल्सची किंमत लक्षणीयरीत्या कमी असायची. यामुळे पर्यटक आपसूकच या लोकांच्या जाळ्यात ओढले जायचे. पर्यटकांकडून एडवांस  घेतल्यानंतर हे संशयित गायब व्हायचे. अशी माहिती यावेळी अधीक्षक कौशल यांनी दिली.   

फसवणूक झालेल्या चंदीगड येथील पंकज धीमान यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. त्यांनी अशाच प्रकारे रुबी व्हिला नावाच्या हॉटेलसाठी २० हजार रुपये देत आगाऊ बुकिंग केले होते. ठरलेल्या तारखेला जेव्हा धीमान वेबसाईटवर दिलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना रुबी व्हिला नावाचा कोणताही बंगला मुळात अस्तित्वातच नसल्याची आणि आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. यानंतर त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्थानकात याबाबत तक्रार नोंदवली. 

याप्रकरणी आयपीएस अधिकारी मयंक दुबे व अरुण बलगोत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरज गावस, उपनिरीक्षक संहिल वारंग, रमेश हरिजन तसेच कळंगुट पोलीस स्थानकाचे शिपाई राज परब यांच्या पथकाने जयपूर (मूळ ग्वाल्हेर ) येथून एकास तर हैदराबाद येथील तिघांना ताब्यात घेतले व गोव्यात आणत त्यांना रीतसर अटक करण्यात आली. अशी माहिती कौशल यांनी दिली. आरोपी सौरभ (ग्वाल्हेर), सय्यद अली मुख्तार, मोहम्मद फिरोज आनी मोहम्मद अझरूद्दीन सैफ ( हैदराबाद) यांना अटक करत चौकशी केल्यानंतर सदर घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचे त्यांनी मान्य केले. हैदराबाद येथे एका भाड्याच्या खोलीत हे काम सुरू होते. याकामी काही महिलांना कर्मचारी म्हणून ठेवण्यात आले होते. १५ वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे जमा केले जायचे. सध्या ही सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. अशीही माहिती कौशल यांनी दिली. 

दरम्यान अशाच प्रकारे अनेकांना लुबाडण्यात आल्याच्या तक्रारी गोवा पोलिसांकडे आल्या आहेत. या विषयी अधिक खोलवर तपास केला असता तब्बल ५०० पर्यटक या घोटाळ्याला बळी पडले असल्याचेही समझले. या सर्वांशी संपर्क साधुन त्यांच्या तक्रारी नोंदवण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार २०२२ पासून सुरू आहे. हे प्रकरण नेमके किती खोलवर गेले आहे याचाही तपास सुरू आहे. असे कौशल म्हणले. 

हेही वाचा