थिवीतील बेकायदा पाणी कंपनी सील

अन्न व औषधे प्रशासनाची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
थिवीतील बेकायदा पाणी कंपनी सील

म्हापसा : ओळावणे थिवी येथील एका मिनरल वॉटर कंपनीवर अन्न व औषधे प्रशासनाने कारवाई केली. वैध परवाने नसताना पाण्याच्या बाटल्या पुरवठा केला जात असल्यामुळे या कंपनीला टाळे ठोकण्यात आले.

मंगळवारी एफडीएच्या अधिकार्‍यांनी म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवस्थळी असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलवर कारवाई केली. यावेळी सदर स्टॉल्सना बाटलीबंद पाणी पुरवठा करणारे एक वाहन आढळले. अधिकार्‍यांना चौकशीवेळी या पुरवठादाराकडे वैध परवाना नसल्याचे आढळून आले.

जत्रास्थळी छाप्यानंतर एफडीएच्या पथकाने थिवीमधील त्या पाणी पुरवठादार कंपनीचा शोध लावला व घटनास्थळी छापा टाकला. ही कंपनी कुलूप बंद असल्यामुळे जागेच्या मालकाला बोलावण्यात आले. मात्र, त्यांनी प्रथम कुलूपची चावी नसल्याचे सांगून सहकार्य केले नाही. नंतर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीचा मागील दरवाजा मालकाने उघडल्यावर या पथकाने कंपनीची झडती घेतली. आतील पाण्याचे नमुने गोळा करीत कंपनीला सील ठोकले.

एफडीएचे अधिकारी रीचर्ड नोरोन्हा यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी या कंपनीचा परवाना संपला आहे. तरीही हे वैध परवान्याविना या कंपनीच्या नावे २५ लिटर बाटलीबंद पाण्याचा पुरवठा होत होता. कंपनीमधील फिल्टर आणि प्रयोगशाळेची यंत्रणा सध्या कार्यरत नसल्याचे दिसून आले. पुढील चौकशीसाठी आम्ही ही कंपनी बंद केली आहे. याची आम्ही सविस्तर चौकशी तसेच पाण्याच्या नमुन्यांची योग्य तपासणी करून आवश्यक कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सोमवारी एफडीएने बोडगेश्वर जत्रेतील स्टॉल्सची तपासणी करीत ते बंद केले होते. मात्र, रात्री उशीरा ते पुन्हा उघडण्यात आले. यामुळे मंगळवारी म्हापसा नगरपालिकेच्या सहाय्याने प्रशासनाने सदर स्टॉलमधील गॅस सिलिंडर, गॅस स्टोव्ह आणि स्वयंपाकाची इतर उपकरणे जप्त केली. 

हेही वाचा