विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे असली, तरी २०२६ पासून सर्वच राजकीय पक्षांकडून लगबग सुरू होणार आहे. शेवटच्या सहा महिन्यांत तर राजकीय अंदाज घेत, कोण कुठल्या पक्षात उडी मारेल हे सांगता येत नाही. अशा काळात आयातांसह भाजप नेत्यांना बांधून ठेवण्यात दामू यशस्वी ठरले, तरच २०२७ मध्ये भाजपचे स्वप्न साकार होऊ शकते.
स्प र्धेत असलेल्या सहा अनुभवी आणि दिग्गज नेत्यांवर मात करीत दामू नाईक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद पटकावले. या पदाची सूत्रे स्वीकारत असताना जुन्या, नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढवण्याचा आणि राज्यातील आगामी सर्वच निवडणुका जिंकण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. परंतु काँग्रेसमधून आलेल्या आमदारांना सांभाळणे, स्वत:च्या पक्षातील नाराज नेत्यांची नाराजी दूर करणे आणि विविध गोष्टींमुळे पक्षापासून फारकत घेतलेल्या नेत्यांना पुन्हा पक्ष कार्यात जोडणे अशा अनेक बाबतीत दामू नाईक यांची कसोटी असेल.
भाजपची विचारधारा जपणाऱ्या आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळतेच, हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दामू नाईक यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. २००२ आणि २००७ अशा दोन विधानसभा निवडणुकांत फातोर्डा मतदारसंघात विजय मिळवलेल्या दामूंना त्यानंतरच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. पण केडर नेते असल्यामुळे भाजपने त्यांना कधीच डावलले नाही. पक्ष संघटनेत त्यांच्याकडे नेहमीच मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. कारण पक्षाने त्यांच्या पराभवापेक्षा पक्षाला मोठे करण्यासाठीची त्यांची धडपड पाहिली. त्यामुळेच प्रदेश भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदापासून ते अल्पावधीतच त्यांनी सरचिटणीसपदापर्यंत झेप घेतली आणि आता ते पक्ष संघटनेतील सर्वोच्च अशा प्रदेशाध्यक्षपदावर विराजमान झालेले आहेत.
कोणतीही व्यक्ती कधीच परिपूर्ण नसते. तिच्यात जसे चांगले गुण असतात, तसे वाईटही असतातच. दामूंच्या बाबतीत तसेच आहे. पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस एक करण्याची तयारी या नेत्यात आहे. पण ‘दामू म्हणजे फटकळ, कुठे, कधी काय बोलेल याचा नेम नाही,’ हा कार्यकर्त्यांनी मारलेला शिक्का मात्र ते अद्याप पुसू शकलेले नाहीत. सर्वांना सोबत घेऊन पक्षाला पुढे नेत असताना दामूंना प्रथम हा शिक्का पुसून टाकावा लागेल. अन्यथा, त्याचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो.
भाजपकडे सध्या विधानसभेत ३३ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यातील २८ आमदार भाजपचे आहेत. या २८ मधील १४ आमदार काँग्रेसमधून भाजपात दाखल झाले आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या रोहन खंवटे आणि गोविंद गावडे यांनी २०२२ ची निवडणूक भाजपच्या उमेदवारीवर लढवली आणि ती जिंकून ते विधानसभेत पोहोचले. त्यामुळे भाजपचे २८ पैकी १६ आमदार हे बाहेरून आलेले आहेत. या १६ पैकी ६ जण मंत्रिमंडळात आहेत. आयातांतील अनेक आमदारांनी गत विधानसभा निवडणूक भाजपमुळे नव्हे, तर स्वत:च्या कर्तुत्वावर जिंकलेली आहे. बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणे, रोहन खंवटे, गोविंद गावडे आदींना गत विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी जाहीरपणे विरोध दर्शवलेला होता. त्यांच्या प्रचारासाठीही भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी मैदानात उतरलेले नव्हते. तरीही या आमदारांनी विजय खेचून आणला. आजही परिस्थिती तीच असल्यामुळे त्यातील अनेक मंत्री, आमदार भाजपला फारशी किंमत देताना दिसत नाहीत. पुढील दोन वर्षांत अशांना सांभाळण्याची मोठी कसरत दामू नाईक यांना करावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांत काँग्रेसच्या आमदारांना पक्षात घेता घेता प्रदेश भाजपची काँग्रेस कधी झाली, हे कुणालाच कळले नाही. या धोरणामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांतील नाराजी आजही कायम आहे. काँग्रेसच्या आमदारांसोबत आलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून अधिक सन्मानाची वागणूक दिली जाते आणि मूळ कार्यकर्त्यांना मात्र बाहेर ठेवले जात असल्याचा राग मूळ कार्यकर्त्यांत अजूनही आहे. माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गेल्या काही वर्षांत अशा कार्यकर्त्यांच्या मनातील रागावर वेळोवेळी नियंत्रण ठेवत त्यांना सोबत ठेवले. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत त्यांना यश मिळत गेले. इथून पुढच्या काळात दामू नाईक अशा कार्यकर्त्यांना कशापद्धतीने सांभाळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२०२७ च्या विधानसभेची रंगीत तालीम असलेली जिल्हा पंचायत निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यानंतर लगेचच पालिका निवडणुका होतील आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू होईल. विधानसभा निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे असली, तरी २०२६ पासून सर्वच राजकीय पक्षांकडून लगबग सुरू होणार आहे. शेवटच्या सहा महिन्यांत तर राजकीय अंदाज घेत, कोण कुठल्या पक्षात उडी मारेल हे सांगता येत नाही. अशा काळात आयातांसह भाजप नेत्यांना बांधून ठेवण्यात दामू यशस्वी ठरले, तर ‘२०२७ मध्ये २७’चे पक्षाचे स्वप्न निश्चित साकार होऊ शकते.