तळागाळातील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून काम करण्याची दामू नाईक यांची हातोटी नवी नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडून तेच अपेक्षित आहे. नवखे दामू आज परिपक्व बनले आहेत.
आमचे मित्र दामोदर ऊर्फ दामू नाईक भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष झाले आणि स्थानिक राजकारणातील त्यांचे अगदी सुरुवातीचे दिवस आठवले. राजकारणात दामू त्यावेळी अगदीच नवखे होते. दामू नाईक यांचा राजकारणातील जवळपास तीन दशकांचा प्रवास अगदी जवळून पाहणाऱ्या पत्रकारांपैकी मी एक असल्याने आज त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यापर्यंत घेतलेली झेप खूपच समाधान देणारी ठरावी. निष्ठेला फळ मिळत नाही, असा गैरसमज करून घेत इकडून तिकडे वा तिकडून इकडे अशा सतत उड्या मारत राहणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी हा एक आदर्श धडा म्हणता येईल. दामू नाईक हा स्व. मनोहर पर्रीकर यांच्या तालमीत तयार झालेला गडी. पर्रीकरांनी सांगावे आणि दामू नाईक यांनी ऐकले नाही, असे कधी झाले नाही. पर्रीकर यांच्या अगदी विश्वासातील गडी असल्याने राजकारणातील खाचाखोचा, कूटनीती हे सगळेच दामू नाईक अगदी व्यवस्थित शिकले. विधानसभेत एखाद्या प्रश्नावर वा विषयावर विरोधकांना अक्षरश: धारेवर धरणे असो वा सरकार पक्षात असताना सरकारचे समर्थन करणे असो, पर्रीकर अगदी विश्वासाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवत आणि दिलेली जबाबदारी पूर्ण करून पर्रीकर यांची आपल्यावरील विश्वासार्हता कशी वाढेल, हेच दामू नाईक यांनी नेहमी पाहिले. मनोहर पर्रीकर यांचा विश्वास संपादन करणे ही तशी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. भल्याभल्यांना जे जमले नाही, ते दामू नाईक यांनी करून दाखवले आणि पुढील राजकीय प्रवासात कठीण परिस्थितीशी संघर्ष करताना त्यांना त्याचा फायदाच झाला, असे मी म्हणेन.
गोव्यात भाजपच्या राजकीय प्रवासातील मीही एक साक्षीदार असल्याने भल्याभल्यांना जे जमले नाही, ते दामू नाईक यांनी करून दाखवले असे म्हणताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्र्वभूमी असलेले डॉ. सुरेश आमोणकर, प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारख्यांची उदाहरणे डोळ्यांसमोर येतात आणि दामू नाईक त्यांना उजवे ठरतात. तीनवेळा विधानसभा निवडणुकीत सलग पराभूत झाल्यानंतरही पक्षासाठी त्याच तडफेने काम करणे, लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत आपले हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याकडेच लक्ष केंद्रित करणे, या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या निश्चितच नाहीत. पण दामू नाईक सगळ्यांना भारी ठरले. तीनवेळा पराभूत होऊनही मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या मर्जीतील एक कार्यकर्ता म्हणून राहणे सहजसोपे नव्हते. पक्षातील काही लोक त्यावर कुत्सितपणे हेटाळणीयुक्त सुरात बोलतानाही आम्ही पत्रकार ऐकत होतो, पण दामू नाईक यांना त्याचे काहीच पडून गेले नव्हते. उलट त्यांनी संघटनेच्या कार्यात अधिकाधिक सहभागी होऊन ते सगळ्यांचेच जवळचे दामू बनून राहिले आणि आज ते सगळ्यांचेच दामू गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीत विराजमान झाले आहेत. दामू नाईक यांचा हा प्रवास कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अभ्यासण्यासारखा ठरावा. २०१२ आणि २०१७ मध्ये पराभूत झाल्यानंतरही पक्षनेतृत्वाने त्यांच्यावरच विश्वास ठेवून २०२२ मध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी दिली, तेव्हा अनेकांचे चेहरे पाहण्याजोगे होते.
आपल्या फातोर्डा मतदारसंघात थोडक्यात का असेना तिसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर तर दामू संपलाच असेच चित्र रेखाटले गेले, पण मला वाटते दामू नव्या तडफेने काम करत राहिले. त्याकरिता त्यांनी जी जिद्द वा इच्छाशक्ती दाखवली, त्यास तर सलाम करावाच लागेल. विजय सरदेसाई यांच्यासारख्या तगड्या गड्याने तर दामूंना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी काहीही करायचे बाकी ठेवले नाही, पण दामू नाईक त्यांना बधले नाहीत. मागील विधानसभा निवडणुकीत तर दामू नाईकांना आपणच विजयी होऊ याचा एवढा प्रचंड विश्वास होता की आमच्यासारख्या मित्रांनी त्यांना आपल्याला कोणत्या खात्याची जबाबदारी घ्यायला आवडेल, असाही सवाल केला होता. दामू नाईक तिसऱ्यांदा पडल्यानंतर आता दामू यांची पुढची पावले काय असतील, याबद्दल उत्सुकता होतीच. दामू नाईक संगीत आणि नाट्यक्षेत्रातही अधूनमधून आपली चमक दाखवायचे, त्यामुळे पक्षकार्य करता करता दामू त्या प्रांतात निश्चितच काही करून दाखवण्याचा प्रयत्न करतील, असे वाटले होते. पण दामू हार मानायला तयार नव्हतेच. दामू हे नाव त्यांच्या तीन पराभवानंतरही पक्ष कार्यकर्त्यांच्या हृदयात असे काही कोरले गेले होते की, संधी येताच त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा संकल्पच त्यांनी केला होता. गोवा प्रदेशाध्यक्षपदासाठी नावे तर अनेकांची होती, पण आमच्यासारख्यांनाही, ज्यांनी दामूचा राजकीय प्रवास जवळून पाहिला आहे, त्यांचीच निवड योग्य ठरेल असे वाटत होते.
खासदार सदानंद तानावडे यांचा राजकीय प्रवासही आम्ही अगदी जवळून अनुभवला आहे. पत्रकारितेच्या पाच साडेपाच दशकांच्या माझ्या प्रवासात अर्थातच श्रीपाद नाईक यांच्यापासून आजचे दामू नाईक यांच्यापर्यंत प्रदेशाध्यक्षांची झालेली निवड प्रक्रिया अगदी जवळून पाहिली आहे. यावेळी पारडे एवढे खाली - वर व्हायचे की सदानंद तानावडे यांच्याच गळ्यात पुन्हा अध्यक्षपदाची माळ पडेल असा माहोल तयार झाला होता. प्रदेशाध्यक्ष म्हणून सदानंद तानावडे यांनी केलेले कार्य अर्थातच लक्षणीय असेच आहे, पण अखेर दामू नाईक यांनीच बाजी मारली आणि ते बाजीगर ठरले. मागील तीन चार दशकांत गोव्याच्या राजकारणात आम्ही पत्रकारांनी अशा खूप काही गोष्टी पाहिल्या की ज्यावर आताही चर्चा करता येईल. पक्षांतरे तर या प्रांतात पाचवीला पुजलेली. आमदार फुटणे, फोडणे, पळवणे यात तर गोव्याचे नाव अगदी आघाडीवर आहे. अशा या प्रदेशात सगळ्यांशीच नाळ जोडून वावरणारे व्यक्तिमत्व म्हणजे दामू नाईक. गोव्यात आजच्या घडीला डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण स्थिर आहे, यात संदेह नाही. नेतृत्वबदलाच्या वावड्या उठणे यातही काही नवीन नाही, पण नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांची जबाबदारी आता अधिकच वाढली आहे. सरकारातील कथित विसंवाद दूर करण्याचे काम त्यांना करावे लागेल. विधानसभा निवडणूक तर दूरच आहे, पण त्यासाठी पक्ष संघटना सज्ज ठेवण्याकरिता त्यांना पावले उचलावी लागतील. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून काम करण्याची दामू नाईक यांची हातोटी नवी नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडून तेच अपेक्षित आहे. नवखे दामू आज परिपक्व बनले आहेत. दामू नाईक यांना आमच्या शुभेच्छा!
- वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९