समाजविघातक घटकांच्या या कृत्याने उत्तर कन्नड जिल्ह्यात पशूप्रेमींत आक्रोशाची भावना
उत्तर कन्नड : कर्नाटक राज्यात गायींवर होणारे हल्ले सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच येथील एका मंदिरात गायीचे कासे कापल्याची घटना घडली. यानंतर म्हैसुर येथे एका वासराची शेपटी कापल्यानंतर आता एका गाभण गायीची मान कापण्याची घटना घडली आहे. हे विकृत घटक येथेच थांबले नाहीत तर, यानंतर सदर गाईचे पोट फाडून आतील वासरालाही त्यांनी बाहेर काढले. यांतर त्यांनी गाईचे व वासराचेही तुकडे केले.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावरा तालुक्यातील सालकोडू गावातील कोंडाकुली येथे ही घटना घडली. या घटनेने उत्तर कन्नड जिल्ह्यात सध्या तणावाचे वातावरण तयार झाले असून, पशूप्रेमींनी सरकारकडे या प्रकारात लक्ष घालण्याची कळकळीची विनंती केली आहे.
दरम्यान या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कन्नड जिल्ह्यात काही बदमाशांनी एका गर्भवती गायीचा शिरच्छेद केला, तिचे पाय कापले आणि वासराच्या शरीरावर देखील घाव करत त्याचा जीव घेतला. बदमाशांनी गाईचे धड शरीरापासून वेगळे करत तिचे डोके, पाय आणि मृत वासराला तेथेच टाकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाय कृष्णा आचारी यांची होती, त्यांनी तीला रविवारी चरण्यासाठी सोडले होते. रात्री देखील गाय परत आली नाही म्हणून सोमवारी आचारी गाईच्या शोधात गेले असता त्यांना गाईचे कापलेले डोके, पाय आणि वासराचे छिन्नविछीन्न अवस्थेत असलेले शव आढळून आले. याप्रकरणी पोलीस अधीक्षक एम नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत १० संशयितांची ओळख पटवली असून त्यापैकी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या प्रकाराचा छडा लावण्यासाठी सहा विशेष पथके तयार करण्यात आली असून, सध्या फरार असलेल्या मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध माध्यमांतून लीड्स गोळा केल्या आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षकांनी हे कृत्य घृणास्पद असल्याचे सांगून स्थानिक तपास व वनविभागाच्या मदतीने गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिली.
दरम्यान सदर प्रकरणाची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी गोहत्येच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप आणि हिंदू संघटनांनी या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. याआधी बेंगळुरूच्या चामराजपेटमध्ये तीन गायींचे कासे कापण्याची आणि म्हैसूरच्या नांजनगुड शहरात एका वासराची शेपटी कापल्याची घटना समोर आली होती. गायींचे कासे कापल्याप्रकरणी आरोपी सय्यद नसरू याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.