प्रियकराची हत्या करणाऱ्या प्रेयसीला मृत्यूदंडाची शिक्षा

केरळमधील घटना : विष देऊन काढला काटा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
20th January, 10:00 pm
प्रियकराची हत्या करणाऱ्या प्रेयसीला मृत्यूदंडाची शिक्षा

कोची : २०२२ मध्ये प्रियकराच्या हत्येप्रकरणी केरळच्या न्यायालयाने एका महिलेला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. नेय्याटिंकारा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी महिलेचा काका निर्मलकुमारन नायर याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तर महिलेच्या आईला आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले.

वृत्तानुसार, २४ वर्षीय दोषी ग्रिष्मा हिनेही न्यायालयासमोर शिक्षेत सौम्यता आणण्याची विनंती केली. ग्रिष्माच्यावतीने सांगण्यात आले की, ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे. तिची शैक्षणिक कारकीर्दही उज्ज्वल राहिली आहे. शिवाय, तिचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. म्हणून, शिक्षा देताना तिच्याशी सौम्यता दाखवली पाहिजे.

५८६ पानांचा आदेश देताना न्यायालयाने म्हटले आहे की, गुन्ह्याच्या गांभीर्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही. ग्रीष्माला भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली दोषी ठरवण्यात आले आहे.


शेरोनवर केला ब्लॅकमेलिंग करण्याचा आरोप

फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, ग्रीष्माचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी निश्चित झाले होते आणि तिला हे नाते संपवायचे होते. जेव्हा शेरोनने तसे करण्यास नकार दिला तेव्हा तिने त्याला संपवण्यासाठी हा कट रचला. दुसरीकडे, बचाव पक्षाने म्हटले की शेरोनकडे ग्रिष्माचे अश्लील फोटो होते, ज्याच्या आधारे तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

  • 1) पोलिसांच्या अहवालानुसार, पीडित शेरोन राज हा तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील परसाला येथील रहिवासी होता.
  • २) ग्रिष्मा आणि त्याच्यामध्ये प्रेमसंबंध चालू होते. १४ ऑक्टोबर रोजी ग्रिष्माने शेरोनला कन्याकुमारी येथील तिच्या घरी बोलावले आणि त्याला आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये मिसळलेले मंद विष दिले.
  • ३) यानंतर, शेरोनला सतत समस्या येत राहिल्या आणि ११ दिवसांनंतर, त्याच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले. २५ तारखेला शेरोन राजचा रुग्णालयात मृत्यू झाला.
हेही वाचा