जनता हवालदिल, आरोग्य विभाग चिंतातुर
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बधल गाव एका रहस्यमय आजारामुळे चर्चेत आहे. दरम्यान, रविवारी १९ जानेवारीला आणखी एका मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. हे सर्व मृत्यू गूढ परिस्थितीत झाले असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बधल गावातील मोहम्मद अस्लम यांच्या सहाव्या आणि शेवटच्या मुलाचा जेएमसी जम्मूमध्ये मृत्यू झाला. अस्लमला ६ अपत्ये होती, त्यापैकी ५ मुलांचा काही दिवसांपूर्वी गूढ आजाराने मृत्यू झाला होता, तर शेवटच्या मुलाचाही रविवारी मृत्यू झाला. अस्लमने गेल्या आठवडाभरात चार मुली, दोन मुलगे आणि मामा आणि काकाला गमावले आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी याबाबत चौकशी करण्यासाठी आंतरमंत्रालयीन टीम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. ही टीम बाधित गावाला भेट देऊन मृत्यूची कारणे जाणून घेणार आहे. एका अधिकृत निवेदनानुसार या टीमचे नेतृत्व केंद्रीय गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी करतील.
बधल पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) वजाहत हुसैन यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली असून ते मृत्यू प्रकरणांचा तपास करत आहेत. गेल्या शनिवारी अनंतनाग-राजोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार (लोकसभा) मियाँ अल्ताफ अहमद यांनी गावाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या संवेदना व्यक्त केल्या. मृत्यूची कारणे शोधण्यासाठी सुरू असलेल्या तपासाबाबत त्यांनी सांगितले. सध्या येथील आरोग्य यंत्रणा देखील कामाला लागली असून हा आजार नेमक्या कोणत्या पद्धतीचा आहे हे मात्र अजूनही समोर आले नाही.