अमरावती : आंध्र प्रदेशात लवकरच लोकांसाठी व्हॉट्सअॅपद्वारे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे मिळवण्याची सुविधा सुरू केली जाईल. आंध्र प्रदेश सरकार त्यांच्या ‘व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स सर्व्हिस’चा भाग म्हणून व्हाट्सअॅपद्वारे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे प्रदान करेल. मुख्य सचिव के विजयानंद यांनी ही माहिती दिली.
के विजयानंद यांनी सांगितले की, या सेवेची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी या महिन्यात आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील तेनाली शहरात या सेवेसाठी एक पायलट प्रोजेक्ट राबवला जाईल. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या उद्दिष्टांनुसार, राज्य सरकार लवकरच लोकांना व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स सेवा प्रदान करण्यास सुरुवात करेल. यामुळे लवकरच लोकांना व्हॉट्सअॅपद्वारे जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र मिळू शकेल.
प्रक्रियेबाबत आढावा बैठक
रिअल टाईम गव्हर्नन्स सोसायटी (आरटीजीएस) कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत या सेवेच्या प्रक्रियेबाबत आढावा बैठक झाली. के विजयानंद यांनी यावर भर दिला की मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट व्हॉट्सअॅप प्रशासन सुरू करून सरकारी सेवा अधिक चांगल्या आणि सोयीस्कर बनवणे आहे. त्यांनी आरटीजीएस आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे.
सरकारी कार्यालयांना भेटी
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरटीजीएस अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश त्यांनी पंचायती राज, आरोग्य आणि नगरपालिका प्रशासन विभागांना दिले. अशा परिस्थितीत, लोकांना व्हॉट्सअॅपवर जन्म आणि मृत्यूचा दाखला मिळण्याची सोय होईल आणि त्यांना कार्यालयात धावपळ करावी लागणार नाही. यापूर्वी आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी अशी सुविधा सुरू केली होती. व्हॉट्सअॅप (क्रमांक ७३३७३५९३७५) द्वारे त्यांचे धान्य सहज विकण्याची सुविधा सुरू करण्यात आली. यामुळे त्यांना त्यांचे उत्पादन विकण्यासाठी बाजारात जावे लागले नाही.