केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात; ३५०० कोटींच्या ५ प्रकल्पांचीही होणार पायाभरणी
पणजी : मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटीला जोडणाऱ्या ६४४ कोटी रूपयांच्या उड्डाण पुलाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे दुपारी गोव्यात आगमन झाले. दाबोळी विमानतळावर शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक व इतरांनी त्यांचे स्वागत केले.
उड्डाण पुलाच्या उद्घाटनासह सुमारे ३५०० कोटींच्या इतर पाच प्रकल्पांची पायाभरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजता वास्को रवींद्र भवन जवळील एलिवेटेड रोडवर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार अंतोनियो वाझ व इतर मान्यवर समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
एमईएस महाविद्यालय ते बोगमाळो जंक्शन पर्यंत फ्लायओव्हर (४७२ कोटी), जुवारी ते मडगाव बायपासपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण (३९८ कोटी), नावेली ते कुंकळ्ळी रस्त्याचे चौपदरीकरण (७४७ कोटी), बेंदोर्डे ते पोळे रस्त्याचे चौपदरीकरण (१३७६ कोटी) व फोंडा ते भोमा रस्त्याचे चौपदरीकरण (५५७ कोटी) या कामांची पायाभरणी यावेळी होणार आहे.