आगीवर नियंत्रण; कोट्यवधी रुपयांचे नुकसान
पणजी : वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट येथे लागलेल्या भीषण आगीत अनेक कार जळून खाक झाल्या. गवताला लावलेली आग गाड्यांपर्यंत पोहचल्यानंतर या गाड्यांनी पेट घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट येथे एका शोरूमच्या बाहेर गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. या शोरूमच्या आसपास मोठ्या प्रमाणात कोरडे रान आहे. या ठिकाणी लावलेली आग हळूहळू उभ्या करून ठेवण्यात आलेल्या गाड्यांच्या दिशेने पसरली व यात या गाड्या जळून खाक झाल्या.
मडगाव, फोंडा, वास्को व वेर्णातील अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक मेहनत करून अखेर ही आग विजवली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत २२ स्कोडा व ११ रेनॉ वाहने जळल्याचा अंदाज असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान यात झाले आहे.