फातोर्ड्यासाठी नव्या उमेदवाराचा शोध

माझे लक्ष आता पूर्ण गोव्यावर : दामू नाईक


21st January, 11:57 pm
फातोर्ड्यासाठी नव्या उमेदवाराचा शोध

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : प्रदेशाध्यक्ष झाल्याने आता माझे लक्ष पूर्ण गोव्यावर राहणार आहे. फातोर्डा मतदारसंघात भाजपसाठी नवा उमेदवार दिला गेल्यास माझी काहीच हरकत नाही. माझा त्याला पूर्ण पाठिंबा राहील. आगामी निवडणुकीत भाजपचे २७ उमेदवार निवडून आणणे, हेच आपले ध्येय राहणार आहे, असे उद्गार भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काढले.
प्रडुंट मीडियाच्या ‘हेड ऑन’ कार्यक्रमात ते बोलत होते. प्रुडंट मीडियाचे संपादक संचालक प्रमोद आचार्य यांनी त्यांची मुलाखत घेतली. फातोर्डासाठी भाजप नवीन उमेदवाराचा शोध घेत असल्याचे संकेत दिले. पक्षाचा कार्यकर्ता, फातोर्डा मंंडळ सचिव, आमदार, पक्षाचा सरचिटणीस आदी पदांची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपद आले आहे. पक्षात मला स्व. मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, गोविंद पर्वतकर, लक्ष्मीकांंत पार्सेकर आदींचे मार्गदर्शन मिळाले.
प्रगतीपुस्तक पाहूनच मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य
सरकारच्या कामात सुधारणा होण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल झाले पाहिजेत. केंद्रीय नेत्यांशी बोलून पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन मुख्यमंत्री मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय घेतील. आमदारांचे प्रगतीपुस्तक तपासूनच मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य होईल, असेही दामू नाईक म्हणाले.
नवे, जुने असा भेदभाव दूर करण्याचे आव्हान
पक्षात नवे, जुने असा भेदभाव असू नये. हा भेदभाव दूर करण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे. काँग्रेसमधून अनेक आमदार पक्षात आले. काही वेळा तडजोड म्हणून नेत्यांना पक्षात प्रवेश द्यावा लागतो. काही वेळा पक्षाची ती गरज असते. निवडून आलेल्या आमदारांना घेऊनच सरकार चालवावे लागते. त्यासाठी मतदारांनी योग्य उमेदवारांना निवडून दिले पाहिजे, असे दामू नाईक यांनी सांगितले.