म्हादई प्रश्नावर वेळ वाया घालवत असल्याचे सिद्ध

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा राज्य सरकारवर आरोप

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
4 hours ago
म्हादई प्रश्नावर वेळ वाया घालवत असल्याचे सिद्ध

पणजी : म्हादईची पाहणी करण्यासाठी आपण कर्नाटकच्या सभापतींकडून परवानगी मागू शकत नाही असे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केल्याने, भाजप सरकार पाणी प्रश्नावर वेळ वाया घालवत असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.  

सभापती रमेश तवडकर यांच्या वक्तव्यामुळे म्हादई प्रश्नावर वेळ वाया घालवणाऱ्या गोव्यातील अकार्यक्षम भाजप सरकारचा पर्दाफाश झाला आहे. पाणी वळवण्याच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसलेल्यांना विनंती करून भाजप सरकारने आपली अकार्यक्षमता दाखवून दिली आहे. गोव्याची जीवनवाहिनी असलेल्या म्हादई प्रश्नाची त्यांना काहीच काळजी नाही, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ८ जानेवारी रोजी सभागृह समितीची दुसरी बैठक घेतली होती. म्हादई तसेच प्रकल्प स्थळाची  पाहणी करण्यासाठी कर्नाटकच्या सभापतींना पत्र लिहून मान्यता देण्याची विनंती करू, असे म्हटले होते. या विधानाची आठवण करून देताना युरी आलेमाव म्हणाले की, सध्या सभापतींनी जी भूमिका घेतली आहे ती पाहता भाजप सरकारचा पर्दाफाश झाला आहे.

सभागृह समितीकडून आपल्याला कोणतेही पत्र आले नसल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. म्हादई वादाच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ भाजप सरकार वेळ वाया घालवत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.


हेही वाचा