डिचोली नगरपालिकेतील गटबाजीच्या राजकारणाला आता पूर्णविराम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया; विजयकुमार नाटेकर बिनविरोध नगराध्यक्ष

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
3 hours ago
डिचोली नगरपालिकेतील गटबाजीच्या राजकारणाला आता पूर्णविराम

साखळी : डिचोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिगेला पोहोचलेली उत्कंठा अखेर संपुष्टात आली. नगराध्यक्ष पदाची माळ ही ज्येष्ठ नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांच्या गळ्यात पडली. विजयकुमार नाटेकर हे पुढील कार्यकाळ सांभाळणार व सर्व १४ ही नगरसेवक त्यांना या कामात सहकार्य करणार. आता या नगरपालिकेतील गटबाजीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळालेला आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.


या नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडण्यासाठी साखळी रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मंडळ अध्यक्ष डॉ. कौस्तुभ पाटणेकर, सरचिटणीस विश्वास गावकर तसेच सर्व १४ नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक होऊन अखेर नगराध्यक्ष पदाची माळ ही ज्येष्ठ नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांच्या गळ्यात पडली.

या नगरपालिकेत सुरू झालेल्या गटबाजीच्या राजकारणामुळे थेटपणे दोन गट पडल्याचे उघड झाले होते. दोन्ही गटांकडून आपल्या गटाचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी मोठी व्युहरचना आखण्यात येत होती. आपल्या गटाचे आकडे वाढवण्यासाठी ही मोठे प्रयत्न सुरू होते. या सर्व प्रयत्नांना फाटा देत भारतीय जनता पक्षाने पक्षाचा एकच उमेदवार हा नगराध्यक्ष असावा, यासाठी प्रयत्न केले.

या सर्व नगरसेवकांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी साखळी रवींद्र भवनात महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. २२ जानेवारी रोजी झाली. या बैठकीत सर्व नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चा करून नगरपालिकेच्या राजकारणाबद्दल व नगराध्यक्ष पदाबद्दल विचारण्यात आले. त्यानंतर सर्वांना एकत्रित येऊन सर्वसमावेशक असा एक उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आला व सर्वांच्या सहमतीने ज्येष्ठ नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांचे नाव समोर आले व त्यांच्या नावाला निश्चिती प्राप्त झाली.

विजयकुमार नाटेकर यांनी, स्वत:साठी हा सुखद धक्का असून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत असताना आपण आजपर्यंत कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा ठेवली नव्हती. मात्र पक्षश्रेष्ठींनी आज सर्वात मोठी जबाबदारी अनपेक्षितपणे आपणास दिली आहे. ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आता या नगरपालिकेचा चौफेर विकास व सर्वांना बरोबर घेऊनच आपण काम करणार, असे नाटेकर यांनी सांगितले.

डिचोली नगरपालिकेच्या राजकारणात १४ ही नगरसेवक एकत्रित आहे. या नगरसेवकांमधून एक उमेदवार हा नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमोद सावंत यांनी सांगितले. या बैठकीत विजयकुमार नाटेकर यांचे नाव निश्चित झाले असून विजयकुमार नाटेकर हे पुढील कार्यकाळ सांभाळणार व सर्व १४ ही नगरसेवक त्यांना या कामात सहकार्य करणार. आता या नगरपालिकेतील गटबाजीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळालेला आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या नगरपालिकेत सुरू असलेल्या राजकीय विषयावर भाष्य करताना सांगितलं की, पक्षाची ध्येयधोरणे व कार्यप्रणाली सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्याप्रमाणे सर्व काम करत आहेत. जे काही राजकारण आणि जे काही विषय आहेत ते येणाऱ्या काळात सर्वांना बरोबर घेऊन बसून सोडविण्यात येणार आहेत. सर्वांमध्ये समेट घडवून आणत पक्षाच्या लक्ष्याकडे आम्ही वाटचाल करणार आहोत. पक्षाचे कार्य हे मोठे असून सर्वांसाठी हे कार्य बांधील आहे, या कार्यात सर्वजण समाविष्ट होऊनच यापुढे काम करतील असा विश्वास व्यक्त केला.

आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये यांनी, नगरपालिकेसाठी तसेच डिचोलीच्या राजकारणासाठी हा एक सर्वसमावेशक असा तोडगा असून योग्य तो निर्णय पक्षाने व मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांनी घेतला आहे, असे सांगितले. आपण अपक्ष आमदार असूनही डिचोली मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसेच पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणेच आपण सर्व काम करीत असून येणाऱ्या काळातही आपले काम असेच सुरू राहणार. जे काही राजकारण आहे त्या राजकारणावर पक्षश्रेष्ठी योग्य तो विचार करून समेट घडवून आणणार. आमदार या नात्याने या पक्षासाठी व डिचोली मतदारसंघासाठी सकारात्मक व विधायक कार्य हे सुरूच राहणार असेही आमदार डॉ. शेट्ये सांगितले. 

हेही वाचा