सरकारचे प्रयत्न सुरू; प्रवास नसेल मोफत
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यात गोव्यातील भाविकांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु हा रेल्वे प्रवास मोफत नसेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
दर बारा वर्षांनी येणारा महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील प्रमुख धार्मिक कार्यक्रमांपैकी एक आहे. गेल्या १३ जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू झाला असून, तो २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. महाकुंभाच्या वेळी गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो, असे हिंदू धर्मात मानले जाते. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी भाविक महाकुंभ काळात प्रयागराजला भेट देऊन तीन नद्यांच्या संगमावर स्नान करत असतात.
दरम्यान, गोव्यातील हिंदू धर्मियांचीही प्रयागराजला भेट देऊन कुंभमेळ्यात सहभागी होण्याची इच्छा असते. परंतु सर्वसामान्यांना आर्थिक कारणामुळे ते शक्य होत नाही. त्यामुळेच यावेळी गोमंतकीय जनतेला महाकुंभ मेळ्याचे दर्शन घडवण्यासाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सुरू केले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची रेल्वे प्रशासनासोबत चर्चाही सुरू आहे. पण, गोवा ते उत्तर प्रदेशपर्यंतचा हा रेल्वे प्रवास मोफत असणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.