गोवा प्रदूषण, अपघातमुक्त करणे आवश्यक !

नितीन गडकरी : वास्कोतील उड्डाणपुलाचे लोकार्पण; विविध कामांचीही पायाभरणी


10 hours ago
गोवा प्रदूषण, अपघातमुक्त करणे आवश्यक !

केबलस्टेड पुलाचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री माॅविन गुदिन्हो, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर व इतर. (अक्षंदा राणे)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : भविष्यात गोव्यात मोठे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकर भूसंपादन करून दिल्यास कामांना प्रारंभ होईल. नवीन बोरी पुलासाठी १२०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. गोवा प्रदूषण व अपघात मुक्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
सुमारे ६४४ कोटी रुपये खर्चाच्या रवींद्र भवन बायणा ते मुरगाव बंदराच्या गेट क्रमांक नऊला जोडणाऱ्या उड्डाणपूल तथा केबलस्टेड आरओबीचे राष्ट्रार्पण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. एमईएस महाविद्यालय चौक ते बोगमाळो चौक दरम्यानचा उड्डाणपूल व क्वीनीनगर चौक येथे व्हीयूपी, झआरी जोडरस्त्याच्या शेवटपासून ते मडगाव बगलरस्त्याच्या आरंभीपर्यंत चौपदरी रस्ता, नावेली ते कुंकळ्ळीपर्यंत चौपदरी रस्ता, बेंदुर्डे ते पोळेपर्यंत चौपदरी रस्ता, फोंडा ते भोमपर्यंत चौपदरी रस्त्यांची पायाभरणी आभासी पद्धतीने मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली. या सोहळ्यात मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री माॅविन गुदिन्हो, सभापती रमेश तवडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार संकल्प आमोणकर, दाजी साळकर, उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, एमपीटीचे अध्यक्ष विनोदकुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.
कन्याकुमारी ते मुंबई द्रुतगती मार्ग करताना गोव्यातील ग्रामीण भागात रिंग रोड करण्याचा विचार आहे. तेथील घरे, जंगल यांना टाळण्यात येऊन हा प्रकल्प केला जाईल. जेणेकरून प्रदूषण कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. बंदराला जोडणाऱ्या उड्डाण पुलामुळे माल वाहतूक सुरळीत होईल. महामार्गावर अतिक्रमणे केलेल्यांना मोजपट्टी लावून नोटिसा द्या. नोटिसांनंतरही अतिक्रमणे पाडली गेली नाही, तर ती पाडण्यासाठी मी बुलडोझर पाठवेन. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण जागा शोधा व तेथे सुधारणा करा, असे आवाहनही मंत्री गडकरी यांनी केले.
सरकार ‘विकसित भारत २०४७’चा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊले टाकत आहे. रेल्वे, पोर्टच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथील मुरगाव बंदरातून औषध उत्पादनांची निर्यात होण्याची गरज आहे. एअरपोर्ट बरोबरच पोर्ट व रेल्वेही महत्त्वाचे आहे. मंत्री गडकरी यांनी गोव्यासाठी खूप दिले आहे. भविष्यातही त्यांचे सहकार्य राहील.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री