पाटवळ शिकारप्रकरणी पोलीस घेणार वनखात्याची मदत

सर्व संशयित अद्याप न्यायालयीन कोठडीत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
पाटवळ शिकारप्रकरणी पोलीस घेणार वनखात्याची मदत

वाळपई : पाटवळ या ठिकाणी वीस दिवसांपूर्वी जंगली प्राण्याची शिकार करण्यासाठी गेलेल्या समद खान याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळाची पाहणी करणे व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस वनखात्याच्या अधिकाऱ्यांची मदत घेणार आहेत. या संदर्भाचे पत्र पोलिसांनी वन खात्याला पाठविले आहे.

वाळपई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. यात बाबू उमर संगर (३८, चिंचमळ म्हाऊस), गौस नूर अहमद (म्हाऊस) व अल्ताफ (नाणूस) यांचा समावेश आहे. या सर्वांना न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यात आले आहे. अजूनपर्यंत कोणाचीही सुटका झालेली नाही. वाळपई पोलीस यंत्रण या संदर्भात सखोल चौकशी करीत आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. मात्र, संशयितांकडून समद खान याच्या मृत्यू संदर्भात स्पष्टपणे माहिती मिळालेली नाही. यामुळे सध्यातरी वाळपई पोलीस गोंधळून गेले आहेत.

वाळपई पोलिसांनी वन खात्याला मदतीसाठी पत्र पाठविले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, त्या भागामध्ये शोध घेत महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. वनखात्याने यासाठी सहकार्य केल्यास त्या भागामध्ये शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यातून महत्त्वाचे धागेद्वारे सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आणखी दोघांना अटक होण्याची शक्यता

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी दोघांना अटक होण्याची शक्यता आहे. शिकार व गोळी प्रकरणात तिघांचा समावेश नसून अन्य काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सदर घटना घडली त्यावेळी संशयितांनी कोणाशी संपर्क साधला याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्यातून अनेकांची नावे पुढे आलेली आहेत. यामध्ये काही स्थानिक राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याचे समजते. येणाऱ्या काळात राजकीय व्यक्तींना अटक झाल्यास आश्चर्य मानण्याची गरज नाही. 

हेही वाचा