चिरेबांध सांगे येथील फार्ममध्ये कामगाराचा संशयास्पद मृत्यू

गावकऱ्यांकडून मृतदेह स्वीकारण्यास नकार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
चिरेबांध सांगे येथील फार्ममध्ये कामगाराचा संशयास्पद मृत्यू

सांगे : चिरेबांध सांगे येथील डी. जे. या फार्ममध्ये काम करणारा कामगार गंगाराम झोरे (५५) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सांगे डी. जे. फार्मात घडली. हा मृत्यू संशयास्पद असल्याने ग्रामस्थांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी देण्यास नकार दिला. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

मंगळवारी दुपारी १२.३० वाजता जेवण झाल्यानंतर हात धुवायला गेल्यानंतर गंगाराम जागीच पडला. त्यानंतर इतर कामगारांनी बघ्याची भूमिका घेतली. वेळीच जर इतर कामगारांनी त्याच्यावर उपाय केले असते तर तो वाचला असता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेची वृत्त समजताच सांगेचे पोलीस निरीक्षक प्रविण गांवस देसाई आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. देसाई यांनी लोकांना समजविण्याचा प्रयत्न केला व मृत कामगाराच्या कुटुंबाला २ लाख व कंपनीच्या वतीने आणखी सहाय्य देण्यात येईल, असे कंपनीने सांगितल्याप्रमाणे लोकांना सांगितले. तेव्हा लोकांनी पंधरा लाखांची मागणी केली. मात्र, वादविवाद सुरू झाल्यावर मृतदेह नेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका माघारी गेली.

गंगाराम हा घरात एकमेव कमवणारा व्यक्ती होता. त्याची बायको आजारी आहे. दोन मुलगे शिक्षण घेत आहेत. कमवणारा माणूस गेल्याने त्यांच्या घरावर संकट आले आहे. त्यांना आधार मिळावा याचसाठी आम्ही १५ लाखांची मागणी करतो, असे ग्रामस्थ सांगतात.

गंगारामला जाणूनबूजून कामगारांनी मारले आहे. त्यांनी बघ्याची भूमिका घेतली नसती तर गंगाराम वाचला असता. आम्ही कंपनीकडे निदान पाच लाख तरी द्यावे, अशी मागणी केली आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह देणार नसल्याचे सांगे तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष सदा डोहिफोडे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच रामा पांढर मिसाळ, माजी सरपंच अनिल जांगळे, माजी पंच माया जांगळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कंपनीने कुटुंबाला सहाय्य करावे : कवळेकर

गंगाराम दुपारी १२.३० वा. जमिनीवर कोसळला तेव्हा इतर कामगारांनी त्यांच्यावर उपचार केले पाहिजे होते. ते न केल्याने त्यांना जाणूनबूजून मारले गेल्याच्या संशय येतो. याची चौकशी व्हायला पाहिजे. कमवता माणूस गेल्याने त्यांचे कुटुंबीय संकटात सापडले आहेत. कंपनीने त्यांची मागणी मान्य करून त्यांना सहाय्य करण्याची गरज आहे, असे बाबू कवळेकर यांनी सांगितले. 

हेही वाचा