६८ वर्षीय वृद्धेला गंडा : १ कोटी रुपये जमा करण्यास पाडले भाग
पणजी : ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे शिवोली-बार्देश येथील ६८ वर्षीय वृद्धेला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने अटक केलेल्या चारपैकी तिघा संशयितांना पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
शिवोली-बार्देश येथील बेर्नाडित फर्नांडिस (६८) या वृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २६ ते २८ डिसेंबर २०२४ रोजी अज्ञात व्यक्तीने तिला वॉट्सअॅप काॅल करून दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगत संपर्क साधला. त्याने तक्रारदाराच्या नावाने गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच तिच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. याशिवाय तिच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे पत्र आल्याची माहिती दिली. तिला हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यात १ कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले.
तक्रारीचा दखल घेऊन सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास केला असता, एसएन पुरम-विजयवाडा येथील एका दागिन्यांच्या दुकानाच्या बँक खात्यात ४० लाख जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, सायबर विभागाचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विजयवाडा येथून संशयित यरमला वेंकटेश्वरलू याला ताब्यात घेतले आणि ७ रोजी गोव्यात आणून अटक केली.
विभागाने यरमलाची चौकशी केली असता, तक्रारदार महिलेची काही रक्कम इतर संशयितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचेही उघड झाले. सायबर विभागाने ११ जानेवारी रोजी केरळ येथून विषक आर आणि मोहम्मदशून सुलेमान या दोघांना अटक केली. त्या दोघांची आणि यरमलाची कसून चौकशी केली असता, यरमलाचे संबंधित बँक खाते रोशन शेख हाताळत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, संशयित रोशन शेखला सायबर विभागाने रविवार, १२ रोजी आंध्र प्रदेशातून अटक करून गोव्यात आणले. या प्रकरणातील चारही संशयितांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्या अर्जावर सुनावणी झाली.
रोशन शेखच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू
न्यायालयाने यरमला वेंकटेश्वरलू याला २० हजार रुपयांच्या आणि १५ दिवस सायबर विभागात हजेरी लावण्याचा व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. तसेच विषक आर आणि मोहम्मदशून सुलेमान या दोघा संशयितांना प्रत्येकी ३० हजार रुपये आणि ३० दिवस सायबर विभागात हजेरी लावण्याच्या व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. तर, रोशन शेख याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.