फोंडा : ‘हिट अँड रन’ प्रकरणातील टेम्पो जप्त, चालक अटकेत

फोंडा पोलिसांचे यश : दुचाकीस्वाराचा झाला होता मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
फोंडा : ‘हिट अँड रन’ प्रकरणातील टेम्पो जप्त, चालक अटकेत

फोंडा पोलिसांनी जप्त केलेला अपघातग्रस्त टेम्पो.

फोंडा : संजीवनी साखर कारखान्यासमोरील राष्ट्रीय महामार्गावर गेल्या गुरुवारी सकाळी हिट अँड रन प्रकरणातील टेम्पोचा शोध लावण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शोध घेत खानापूर (कर्नाटक) येथून टेम्पो जप्त केला आहे. तसेच टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे. अपघातात दुचाकी चालक महमदरिफ हुसेनबाशा मोमीन (भूमिकानगर-उसगाव) याचा जागीच मृत्यू झाला होता, तर मागे बसलेला रोहित निकोलस कुजर (२०, भूमिकानगर, मूळ झारखंड) हा जखमी झाला होता.
गेल्या बुधवारी रात्री मोले येथे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला दुचाकी घेऊन गेलेले महमदरिफ मोमीन व रोहित कुजर हे दोघे लिंबू व कांदे कमी पडल्यामुळे पहाटेच्या वेळी उसगाव येथे आले होते. कांदे व लिंबू घेऊन जात असताना संजीवनी कारखान्यासमोरील रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अद्यात वाहनाची धडक बसल्याने अपघात घडला होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने अपघात काळापासून पळ काढला होता. फोंडा पोलिसांनी यासंबंधी विविध ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचा आधार घेत अपघातग्रस्त केए-५५-एफ-१७६४ क्रमांकाचा टेम्पो खानापूर येथून ताब्यात घेतला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टेम्पो गवत घेऊन वाळपई येथे जात होता. उसगाव येथे अपघात घडल्यानंतर परत जाताना खोतोडा-वाळपई मार्गावरून खानापूर गाठले होते. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव जल्मी, पोलीस शिपाई आदित्य नाईक, केदार जल्मी, अमेय गोसावी, शिवाजी चव्हाण व साईश मांद्रेकर यांनी अपघाताला कारणीभूत ठरलेला टेम्पो ताब्यात घेण्यात यश मिळविले.

हेही वाचा