वेर्णातील आगीत ३३ कार भस्मसात

कोट्यवधींचे नुकसान : कोरड्या गवताने पेट घेतल्याने पसरली आग


10 hours ago
वेर्णातील आगीत ३३ कार भस्मसात

आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली वाहने आणि आकाशात उठलेले धुराचे लोट.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीतील रेनॉ कार सर्व्हिस सेंटरच्या बाहेर सर्व्हिसिंगसाठी ठेवण्यात आलेल्या २२ स्कोडा व ११ रेनॉ, अशा एकूण ३३ कार मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान लागलेल्या आगीमध्ये भस्मसात झाल्या. यामध्ये एक डेमो कार होती. प्राथमिक अंदाजानुसार नुकसानीचा आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. वेर्णा पोलिसांनी पंचानामा केला. जेथे कार ठेवण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी कोरडे गवत आहे. त्यामुळे गवताला आग लागल्यावर तेथील वाहनांनी पेट घेतला. आग विझविण्यासाठी वास्को, वेर्णा, पणजी, मडगाव, फोंडा, कुडचडे येथील अग्निशमन दलांना परिश्रम घ्यावे लागले. तेथील खासगी आस्थापनांतील आगरोधक उपकरणांचाही वापर करण्यात आला. त्यानंतर आग नियंत्रणात आली. आगीचा त्या कंपनीच्या जनरेटरलाही झळ बसल्याचे समजते.


लोटली येथे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावरील वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये रेनॉ कार सर्व्हिस सेंटर आहे. येथे सर्व्हिसिंगसाठी आलेल्या कार जवळच्या मोकळ्या मैदानात उभ्या केल्या जातात. मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास तेथे गवताला आग लागली होती. कोरडे गवत आणि वाऱ्याचा जोर अधिक असल्यामुळे ती वेगाने पसरली. पहाता पहाता या आगीने सर्व्हिसिंगसाठी उभ्या केलेल्या एक एक कारला आपल्या कवेत घेणे सुरू केले. कारमध्ये इंधन असल्यामुळे मोठा भडका उडाला. सर्व्हिसिंगसाठी आलेल्या कार जवळजवळ उभ्या केलेल्या असल्यामुळे ही आग पसरत गेली आणि या आगीने रौद्ररूप धारण केले. शोरूम जवळ असलेली स्टोअर रूमही जळून खाक झाली. एकाच वेळी ३३ कार जळत असल्याने आकाशात धुराच प्रचंड लोट पसरत होता.


काही कारनी पेट घेतल्याचे दिसताच तेथील एका फर्निचर फॅक्टरीच्या कामगारांनी व इतरांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. पाईप लावून पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला. वारा तसेच सर्व कारमध्ये इंधन असल्याने आग हा हा मोठ्या प्रमाणात पसरली. तेथील कामगारांनी धुराचा सामना करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीसंबंधी फर्निचर फॅक्टरीच्या मालकाने अग्निशमन दलाला माहिती दिली. तेथे आलेल्या बंबाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तथापि आग आटोक्यात येणे शक्य नसल्याचे दिसून आल्यावर इतर ठिकाणच्या अग्निशमन दलांना माहिती देण्यात आली. त्यानंतर तेथे विविध ठिकाणांहून आलेल्या बंबांनी आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवावांनी तेथील गवतावर व वाहनांवर पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. इंधन असल्याने इंजिनातील आग विझविण्यासाठी जवानांना बरीच धावपळ करावी लागली.


यापूर्वीही गवताला लागली होती आग
तेथील कामगारांनीही महत्त्वाची भूमिका बजाविली. त्यांनी टँकरमधील पाणी पाईपद्वारे आगीवर मारून आग विझविण्याची धडपड सुरू केली होती. दोन-अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यापूर्वीही तेथील सुक्या गवताला आग लागली होती. त्यावेळीही तेथील फर्निचर फॅक्टरीच्या व इतर कामगारांनी ती विझविली होती. तेथे संबंधित कार सर्व्हिसिंग सेंटर मालकांनी खबरदारी घेण्याची गरज होती, असे फर्निचर फॅक्टरीच्या अधिकाऱ्याने म्हटले.