चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टीम इंडिया

Story: क्रीडारंग |
20th January, 10:45 pm
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टीम इंडिया

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही क्रिकेट जगतातील एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. ही स्पर्धा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम आठ संघांना एकत्र आणते. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही स्पर्धा विशेष महत्त्वाची आहे, कारण भारतीय संघाने यापूर्वी या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

२०१३ मध्ये भारतीय संघाने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०१७ मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीतमध्ये पोहोचला होता. परंतु पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावांचा डोंगर उभारला आणि भारतीय संघ केवळ १५८ धावांवर गारद झाला. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याच्या निर्णयावर बरीच टीका झाली होती. कारण स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता आणि त्यावेळी भारताने प्रथम फलंदाजी केली होती. त्यामुळे अंतिम सामन्यातही भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल, असे अपेक्षित होते. मात्र ऐनवेळी निर्णय बदलण्यात आला. स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वादही चव्हाट्यावर आला होता. त्यांच्या वादामुळेच भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी गमवावी लागली, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती.

यंदा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात अनेक अनुभवी खेळाडूंसह नवीन प्रतिभाही समाविष्ट आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले सामने दुबईत खेळणार आहे. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशसोबत होणार आहे, तर २३ फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायहोल्टेज सामना रंगणार आहे. २०२३ विश्वचषकातील भारतीय संघाचे उल्लेखनिय प्रदर्शन पाहता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही तशाच प्रकारचे प्रदर्शन करू शकतो, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

टीम इंडियासाठी, खास करून रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी महत्त्वाची स्पर्धा मानली जात आहे. कारण ही स्पर्धा दोघांचे पुढील भवितव्य ठरवणार आहे. दोघेही सध्या खराब फॉर्ममधून जात आहेत. या स्पर्धेतही त्यांचे प्रदर्शन त्यांच्या सध्याच्या फॉर्मप्रमाणे राहिल्यास त्यांच्यावर निवृत्ती घेण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आपण आशा करूया की, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आपली गमावलेली लय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळवतील.

प्रवीण साठे