४० वर्षांपूर्वीच्या मुख्य जलवाहिन्या बदलणार
आंगड-म्हापसा येथे जलवाहिनी बदलण्याचे सुरू असलेले काम. (उमेश झर्मेकर).
म्हापसा : शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणेच्या दृष्टीने पीडब्ल्यूडीच्या पाणी पुरवठा विभागातर्फे ४० वर्षांपूर्वीच्या मुख्य जलवाहिन्या बदलण्यासह जलकुंभांचे बांधकाम हाती घेतले आहे. या दोन्ही विकासकामांवर अमृत २.० या केंद्र सरकारच्या योजनेतून २४ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
म्हापसा शहरात गेल्या काही वर्षांपासून पाणी पुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. भूमिगत जलवाहिन्या जुनाट झाल्यामुळे त्या वारंवार फुटत आहेत. तसेच यातील बर्याच वाहिन्यांची कल्पना विद्यमान कर्मचार्यांना नसल्याने दुरुस्तीच्या कामातही अडथळा निर्माण होतो. तसेच नळाद्वारे पुरवठा होणारे पाणी साठवण्यासाठी भुयारी तसेच ओव्हर हेड जलकुंभ देखील अपुरे पडत होते.
यावर तोडगा म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने शहरातील २०० एमएम, १५० एमएम व १०० एमएम या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एसी या सिमेंट काँक्रिट व सीआय या कास्ट आयर्नच्या (लोखंडी) जुनाट जलवाहिन्यांच्या जागी आठ कोटी रुपये खर्चुन डक्लाईन आयन (डीआय) दर्जाच्या वाहिन्या घातल्या जात आहेत. या आधुनिक वाहिन्या भविष्याचा विचार करून घालण्यात येत असून त्यांची वॉरंटी सुमारे १०० वर्षे आहे.
म्हापसा शहरातील सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या जुन्या वाहिन्यांच्या जागी या वाहिन्यांचे जाळे टाकले जाणार आहेत. सध्या हाऊसिंग बार्ड, गणेशपुरी, एकतानगर, आंगड व करासवाडा येथे वृंदावन हॉस्पिटल ते संकल्प हॉस्पिटल या भागात हे काम सुरू आहे. डांगी कॉलनी, आल्तीन, शेळपे, कुचेली, करासवाडा, धुळेर, पेडे, आकय, कामरखाजन या भागात रस्ता कापण्याची परवानगी मिळेल त्याप्रमाणे जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येईल.
यापुर्वी २०१८ मध्ये मरड, अन्साभाट ते चंद्रनाथ गॅरेज आणि उसापकर जंक्शन ते गणपती मंदिर-खोर्ली या ठिकाणी जलवाहिनी बदलण्याचे चार किलोमीटर अंतराचे काम करण्यात आले होते. आता दुसर्या टप्प्याचे काम सुरू आहे.
चार जलकुंभांसाठी १६ कोटी
१६ कोटी रुपये खर्चाचे चार जलकुंभ उभारले जात आहेत. दत्तवाडी येथे २००० क्युबिक मीटर क्षमतेचा मास्टर बॅलंसिंग रिजर्व टँक (एमबीआर) जलकुंभ, गणेशपुरी व करासवाडा येथे ६५० क्युबिक मीटर क्षमतेचे ओव्हरहेड जलकुंभाचे काम सुरू आहे, तर आल्तीन येथे जुन्या आझिलो क्वाटर्सच्या जागेतील ६५० क्युबिक मीटर क्षमतेचा ओव्हरहेड जलकुंभ उभारला जाणार आहे.
एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
म्हापसा शहरातील जलवाहिनी बदलण्याचे काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य खात्याने ठेवले आहे. तसेच याच कालावधीत जलकुंभांचे कामदेखील पूर्णत्वास आणण्यावर भर दिला जात आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणी पुरवठ्यात सुधारणा होण्यास मदत मिळेल, अशी माहिती पीडब्ल्यूडीच्या अधिकार्यांनी दिली.