गोवा : एलडीसी उमेदवारांना गुणांविषयी आयोगाकडे तक्रार करण्याची संधी

एलडीसीच्या सीबीटी-११ परीक्षेचा निकाल २७ जानेवारीला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
गोवा : एलडीसी उमेदवारांना गुणांविषयी आयोगाकडे तक्रार करण्याची संधी

पणजी : गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या एलडीसी पदांसाठीच्या सीबीटी-११ परीक्षेचे प्रश्न किंवा गुणांविषयी तक्रार करण्याची संधी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना मिळणार आहे. तक्रारीसंबंधीचा अर्ज भरून तो आयोगाकडे प्रत्यक्ष सादर करावा लागणार आहे. तक्रारीची तपासणी करून तज्ज्ञ त्यावर निर्णय घेतील. दरम्यान, सीबीटी - ११ परीक्षेचा निकाल २७ जानेवारी रोजी आयोगाच्या वेबसाईटीवर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कर्मचारी भरती आयोगाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
एलडीसी पदांसाठीची सीबीटी - ११ परीक्षा सध्या टप्प्याटप्प्याने सुरू आहे. ११ जानेवारी, १२ जानेवारी, १८ जानेवारी आणि १९ जानेवारी या चार टप्प्यातील परीक्षा घेण्यात आली. आता २५ जानेवारी रोजी अंतिम टप्प्याची परीक्षा घेतली जाणार आहे. ती परीक्षा झाल्यानंतर २७ जानेवारी रोजी निकाल वेबसाईटवर अपलोड केला जाणार आहे.
या परीक्षेतील गुणांविषयी किंवा प्रश्नांविषयी तक्रार असल्यास उमेदवारांना ती लेखी स्वरुपात सादर करावी लागणार आहे. तक्रारींवर निर्णय झाल्यानंतर अंतिम गुण जाहीर केले जातील. तसेच पुढील परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नोलॉजी (आसगाव), सेंट झेवियर (म्हापसा), डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (फातोर्डा), रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड आर्टस् (नावेली), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नोलॉजी (कुंकळ्ळी) या केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे.

२३२ पदांसाठी २२ हजार ४५ अर्ज
परीक्षेसाठी चार तुकड्या करण्यात आल्या असून सकाळी ९.१५ ते १०.३० वाजेपर्यंत पहिल्या तुकडीसाठी पेपर घेतला जातो. त्यानंतर ११.३० ते १२.४५ वाजेपर्यंत दुसरी तुकडी, दुपारी २ ते ३.१५ तिसरी आणि संध्याकाळी ४.१५ ते ५.३० वाजेपर्यंत चौथ्या तुकडीसाठी परीक्षा घेतली जाते. एलडीसीच्या २३२ पदांसाठी २२ हजार ४५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

हेही वाचा