गोवा : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पाळीव कुत्र्यांची नोंदणी

नोंदणीची प्रक्रिया नगरविकास खात्याकडे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
गोवा : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पाळीव कुत्र्यांची नोंदणी

पणजी : राज्यातील पाळीव कुत्र्यांच्या नोंदणीची प्रक्रिया नगरविकास खात्यामार्फत करण्यात येणार असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ती अधिकृतपणे सुरू होईल, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी ‘गोवन वार्ता’ला दिली.
हिंस्र जातीच्या पाळीव कुत्र्यांकडून नागरिकांचे चावे घेण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत उघडकीस आले. यात काही बालकांचा बळीही गेला आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच प्रकारच्या पाळीव कुत्र्यांची नोंदणी ठेवण्याचे सरकारने निश्चित केले होते. सुरुवातीला हे काम पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याने की पंचायत खात्याने करायचे, याबाबत विचारविनिमय सुरू होता. परंतु हे काम आता नगरविकास खात्याकडे देण्यात आले आहे.
पाळीव कुत्र्यांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन नोंदणीचे पोर्टल तयार आहे. परंतु ते अद्याप अधिकृतपणे सुरू करण्यात आलेले नाही. कुत्र्यांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतर कुत्र्यांची नोंदणी सुरू होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

अपाय झाल्यास मालकाची जबाबदारी!
काही महिन्यांपूर्वी सरकारने पाळीव कुत्र्यांच्या मालकांसाठी धोरण आखले आहे. या धोरणांतर्गत, पाळीव कुत्र्यांच्या मालकांना त्यांच्या कुत्र्यामुळे होणाऱ्या कोणत्याही घटनेची जबाबदारी घेत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. त्यांच्या कुत्र्यामुळे एखाद्याला इजा किंवा मृत्यू झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मालकाला घ्यावी लागणार असून इजा पोहोचलेल्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्चही करावा लागणार आहे.            

हेही वाचा