लघू आणि मध्यम गेस्ट हाऊस चालक असोसिएशनकडून पर्यटन संचालकांशी भेट
पणजी : गोवा सहज दारू मिळण्सायाठी कुप्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावर दारू पिऊन तेथेच कचरा टाकतात. अशा पर्यटकांमुळे चांगले पर्यटक गोव्यात येत नाहीत. यामुळेच गोव्याची अधिक बदनामी होत आहे, असा दावा लघू आणि मध्यम गेस्ट हाऊस चालक असोसिएशनचे उपाध्यक्ष डिक्सन वाझ यांनी केला आहे. पर्यटन विभागाने या संदर्भात याेग्य पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सोशय मीडियावरून गोव्याच्या होणाऱ्या बदनामीबाबत लघू आणि मध्यम गेस्ट हाऊस चालक असोसिएशनच्या सदस्यांनी पर्यटन संचालक सुनील अंचिपाका यांची भेट घेतली.भेटीनंतर बोलताना, असोसिएशनचे उपाध्यक्ष डिक्सन वाझ म्हणाले की, पर्यटन कधीही भरभराटीला येऊ शकते आणि कधीही ते नष्ट होऊ शकते. गेल्या काही महिन्यांत गोव्याचे नाव सोशल मीडियावर बदनाम करण्यात येत आहे. यावर काय तोडगा काढता येईल, याबाबत पर्यटन संचालकांशी सविस्तर चर्चा केली.
गेस्ट हाऊसचे मालक पर्यटकांशी थेट संपर्कात असतात. मोठ्या हॉटेल्समध्ये पर्यटक अभिप्राय देतात. त्यांनी आम्हाला दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आम्ही संचालकांशी चर्चा केली, वाझ म्हणाले.गोव्यात सुरू असलेल्या अनके घोटाळ्यांमुळे, तसेच गुन्हेगारीच्या बातम्यांमुळे गोव्याची बदनामी होत हे. पण काहीजण याचा वापर करून गाेव्याची मोठ्या प्रमाणात बदनामी करत आहेत. यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे वाझ म्हणाले.गोवा हे सहज मिळणाऱ्या दारूसाठी कुप्रसिद्ध आहे. काही लोक रात्री उशिरा समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान आणि पार्टी करतात आणि त्याच ठिकाणी कचरा फेकतात. त्यामुळे चांगले पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतात.अशा पर्यटकांना रोखण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पोलीस आणि सुरक्षा रक्षक तैनात करावेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसेल. नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करावी, असे असोसिएशनचे अध्यक्ष संतोष यांनी सांगितले.