केंद्र सरकारची आकडेवारी : सर्वाधिक ५०.१५ टक्के निर्यात औषधांची
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातून एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या आठ महिन्यांत १३ हजार ९०५ कोटी रुपयांच्या मालाची परदेशात निर्यात झाली आहे. २०२३ मध्ये याच कालावधीत १२ हजार ९०० कोटी रुपयांच्या मालाची निर्यात झाली होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याने ही आकडेवारी जाहीर केली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या काळात गोव्यातून सर्वाधिक ६,९८४ कोटी रुपयांची औषध उत्पादनांची निर्यात झाली. गोव्यातून झालेल्या एकूण निर्यातीत औषध उत्पादनांचा वाटा ५०.१५ टक्के होता.
यानंतर २,३५९ कोटी रुपयांच्या अभियांत्रिकी मालाची निर्यात झाली. एकूण निर्यातीपैकी अभियांत्रिकी मालाची टक्केवारी १६.९४ इतकी होती. एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान १,१८७ कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उत्पादने (८.५२ टक्के), १,१७१ कोटी रुपयांची रासायनिक उत्पादने (८.४१ टक्के), ७१६ कोटी रुपयांची मरीन उत्पादने (५.१४ टक्के), ३३० कोटी रुपयांची प्लास्टिक व लिनोलेयम उत्पादने (२.३७ टक्के), तर ७२५ कोटी रुपयांची (५.२१ टक्के) अन्य मिश्र उत्पादने गोव्यातून निर्यात करण्यात आली आहेत.
याशिवाय एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या काळात गोव्यातून ९.१५ कोटी रुपयांचे मसाल्याचे पदार्थ, ३३ कोटी रुपयांचे सिरॅमिक, तर ४.९२ कोटी रुपयांच्या हस्तकला उत्पादनांची निर्यात झाली होती. ऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत नोव्हेंबर २०२४ मध्ये अभियांत्रिकी मालाची निर्यात ११३ टक्क्यांनी वाढली होती. इलेक्ट्रॉनिक, मरीन यांची निर्यातदेखील वाढली होती. मात्र औषध, प्लास्टिक, लोहखनिज व अन्य मिश्र उत्पादनांची निर्यात किंचित कमी झाल्याचे आकडेवारीत नमूद केले आहे.
२५९ कोटींची लोहखनिज निर्यात
वाणिज्य आणि उद्योग खात्याच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ मध्ये गोव्यातून २५९ कोटी रुपयांच्या लोहखनिजाची निर्यात झाली. या दरम्यान संपूर्ण देशातून ११ हजार ५६८ कोटी रुपयांचे लोहखनिज निर्यात झाले. लोहखनिज निर्यातीत गोवा देशात तिसऱ्या स्थानी होता. ओडिशा प्रथम व कर्नाटक दुसऱ्या स्थानी होता.
काजू निर्यातीत गोवा सातव्या स्थानी
एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान देशातून १,७९४ कोटी रुपयांच्या काजूची निर्यात झाली. यातील गोव्यातून ९ कोटी ६७ लाख रुपये किमतीच्या काजूची निर्यात झाली आहे. काजू निर्यातीत गोवा देशात सातव्या स्थानी होता. वरील कालावधीत केरळमधून सर्वाधिक ७६५ कोटी रुपयांच्या काजूची निर्यात झाली.