पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकसाठी ८.७४ रुपये
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह आहारासाठीचे दर सरकारने वाढवले आहेत. त्यामुळे माध्यान्ह आहार तयार करणाऱ्या स्वयंसाहाय्य गट तसेच पालक-शिक्षक संघांना दिलासा मिळणार आहे. पूर्व प्राथमिक तसेच प्राथमिक विद्यार्थ्यांसाठीचे नवे दर ८ रुपये ७४ पैसे, तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठीचा दर ११ रुपये १२ पैसे आहे. या विषयीचा आदेश शिक्षण खात्याने जारी केला आहे.
यापूर्वी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह आहाराचा दर ८ रुपये होता. तसेच उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठीच्या माध्यान्ह आहाराचा दर १० रुपये होता. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांसाठीच्या माध्यान्ह आहाराचा दर ७४ पैशांनी वाढला, तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह आहाराचा १ रुपये १२ पैशांनी वाढला आहे. ही दरवाढ १ डिसेंबर २०२४ पासून लागू झाली आहे. आदेश मात्र मंगळवारी जारी करण्यात आला आहे. माध्यान्ह आहारातील पदार्थ आणि अन्य अटी पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. पंतप्रधान पोषण आहार योजनेखाली आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्याची तरतूद आहे. सर्व राज्यांमध्ये ही योजना सुरू आहे. चपाती, पुलाव, भाजी असे पदार्थ माध्यान्ह आहारात दिले जातात. आहाराचे दर वाढवण्याची मागणी स्वयंसाहाय्य गटांकडून केली जात होती. पालक-शिक्षक संघ, तसेच स्वयंसाहाय्य गट माध्यान्ह आहाराचा पुरवठा करतात.