चोर म्हणाला, ‘मी दोषी’; कोर्टाने सुनावली ४८ दिवसांची कोठडी

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीप्रकरणी राजेश मापारी दोषी


11 hours ago
चोर म्हणाला, ‘मी दोषी’; कोर्टाने सुनावली ४८ दिवसांची कोठडी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : एका चोराने हुशारीने आपला कोठडीतील संभाव्य काळ कमी करण्यात यश मिळवले आहे. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी केल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चोराला न्यायालयात उभे करण्यात आले. त्याने न्यायाधीशांना ‘‘होय, मी मंगळसूत्राची चोरी केली आहे’’, असे स्पष्टच सांगितले. त्यामुळे त्याची ४८ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याने चोरी कबूल केली नसती तर न्यायालयात खूप दिवस सुनावणी चालली असती आणि निकाल येईपर्यंत कदाचित त्याला कोठडीत राहावे लागले असते.
माशेल ते सांतईस्तेव्ह येथील पुलावरून चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी घडली होती. या मंगळसूत्राची किंमत १ लाख ४० हजार रुपये होती. या चोरीप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी गतीने तपास करून राजेश गोपीनाथ मापारी (३७, पोंबुर्फा) याला अटक केली होती. या प्रकरणी राजेशने गुन्ह्यात वापरलेली जीए ०७ एजे ५०४८ क्रमांकाची स्कूटरही जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी १२ डिसेंबर रोजी फोंडा प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. विशेष म्हणजे, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर एका महिन्यातच प्रकरणाचा निकालही लागला आहे. राजेश मापारीने गुन्हा मान्य केल्यामुळे न्यायालयाने त्याला दोषी ठरविले. त्याला ४८ दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि ५०० रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. राजेश मापारी २७ नोव्हेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने आता सुनावलेला ४८ दिवसांचा तुरुंगवास त्याला यापुढे भोगावा लागणार आहे. म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोशन मार्टिन यांनी याप्रकरणी तपास केला.