सुमारे १,६०० विद्यार्थी करतात फेरतपासणीची मागणी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या अंतिम निकालानंतर जितके विद्यार्थी पेपरच्या फेरतपासणीसाठी अर्ज करतात, त्यांपैकी सरासरी ४० टक्के विद्यार्थ्यांचे गुण बदलतात, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (गोवा बोर्ड) सचिव विद्यादत्त नाईक यांनी मंगळवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
दरवर्षी इयत्ता दहावीतील सुमारे ७००, तर इयत्ता बारावीचे सुमारे ९०० विद्यार्थी फेरतपासणीसाठी गोवा बोर्डाकडे रितसर अर्ज करतात. काही विद्यार्थी आपल्याला मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतात. त्यामुळे ते उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याची मागणी करतात. तर, अनेक विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी आवश्यक गुण मिळत नसल्यामुळे फेरतपासणीसाठी अर्ज करतात. दरवर्षी दोन्ही वर्गांतील मिळून सुमारे १,६०० विद्यार्थी फेरतपासणीसाठी अर्ज करत असतात. त्यांपैकी ४० टक्के विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन गुण वाढतात, असे नाईक यांनी स्पष्ट केले. उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांकडून जे शुल्क आकारते, त्यातून मंडळाला प्रत्येक वर्षी सुमारे ११ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.
वाढीव शुल्काचा निर्णय रद्द झाल्यामुळे समाधान
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालानंतर पेपरची फेरतपासणी करावयाची असल्यास बोर्डाकडून संपूर्ण पेपरसाठी ७०० रुपयांचे शुल्क घेतले जात होते. पण, यंदा फेरतपासणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपये घेण्याचा निर्णय अगोदर मंडळाने घेतला होता. परंतु, या निर्णयावर अनेक शिक्षण संस्थांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर बोर्डाने यंदा पेपर फेरतपासणीची पूर्वीचीच पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. शिवाय पेपरच्या फेरतपासणीची मागणी करत असताना विद्यार्थ्यांना प्रथम फोटोकॉपीची मागणी करण्याची अटही रद्द केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.