डिसेंबरमधील देशाचा महागाई दर ५.२२ टक्के
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये गोव्यासह संपूर्ण देशात अन्न धान्य, भाजीपाला, डाळी, साखर आदींच्या किमतीत किरकोळ घट झाली. यामुळे डिसेंबरमधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दरात किंचित घट झाली. डिसेंबरमधील संपूर्ण देशाचा महागाई दर ५.२२ टक्के राहिला. गोव्यातील महागाई दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी म्हणजे ४.४६ टक्के इतका होता.
गोव्यातील डिसेंबरमधील महागाई दर हा दोन महिन्यांतील सर्वात कमी आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर ४.६७ टक्के, तर नोव्हेंबरमध्ये ४.६५ टक्के होता. महागाई दर कमी असण्याच्या यादीत गोवा देशात सातव्या स्थानी राहिला. केंद्रीय सांख्यिकी आणि अमलबजावणी खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार, डिसेंबरमध्ये तेलंगणा येथील महागाई दर सर्वात कमी म्हणजे ३.१४ टक्के होता. मणिपूर येथील महागाई दर सर्वाधिक ९.४ टक्के राहिला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) महागाई दराची मर्यादा ४ टक्के इतकी ठेवली आहे. महागाई दराची कमाल मर्यादा ६ टक्के इतकी आहे. अहवालानुसार, नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये प्रामुख्याने अन्नधान्यांच्या कमी झालेल्या किमतीमुळे महागाई दर कमी झाला. असे असले तरी गतवर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत २०२४ डिसेंबरमध्ये लसूण, बटाटा, मटार, कोबी आणि खोबरेल तेलाचे भाव वाढले आहेत.
अहवालानुसार मणिपूरनंतर महागाई दर अधिक असण्यात छत्तीसगड (७.६३ टक्के), बिहार (७.३६ टक्के), ओडिशा (६.९६ टक्के),केरळ (६.३६ टक्के), उत्तर प्रदेश (६.३६ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर मिझोरम (४.११ टक्के), महाराष्ट्र (४.२ टक्के), आंध्र प्रदेश (४.३४ टक्के), राजस्थान (४.४४ टक्के) या राज्यातील महागाई दर तुलनेने कमी होता. केंद्रशासित प्रदेशांत दिल्ली येथील महागाई दर २.६५ टक्के होता.