‘एनईपी’अंतर्गत राज्यात येणार दोन क्लस्टर विद्यापीठे : मुख्यमंत्री

सरकारी कर्मचारी भरती आयोगामार्फतच करण्याचा पुनरुच्चार


11 hours ago
‘एनईपी’अंतर्गत राज्यात येणार दोन क्लस्टर विद्यापीठे : मुख्यमंत्री

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत (एनईपी) उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांत दोन क्लस्टर विद्यापीठांची स्थापना करण्यात येईल. पण, गोवा विद्यापीठ तसेच राहील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या ‘एनईपी’ची सर्वांत जलदगतीने अंमलबजावणी करणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आता या धोरणाअंतर्गत राज्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये दोन क्लस्टर विद्यापीठांची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
सरकारी नोकरीची पदे भरण्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठीच आपण कर्मचारी भरती आयोगाची स्थापना केली. आयोगाकडून गेल्या वर्षभरापासून सरकारी नोकरीची ‘क’ वर्गातील पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षा संगणकीय पद्धतीने (सीबीआरटी) पारदर्शकपणे होत असल्यामुळे राज्यभरातील तरुण-तरुणींकडून परीक्षांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळेच यापुढे एकाचवेळी किमान दहा हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतील, अशा प्रकारची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्याच महिन्यात आठ कोटींचा महसूल
मोपा येथे कार्यान्वित झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातून राज्याला महसूल मिळण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्याच महिन्यात या प्रकल्पातून राज्याला आठ कोटींचा महसूल प्राप्त झालेला आहे. पुढील काळात या महसुलात आणखी वाढ होईल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
स्पर्धा परीक्षांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना करणार साहाय्य
राज्यातील अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस यांसह इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी इतर राज्यांमध्ये जात असतात. अनेकदा तेथे त्यांना निवासासंदर्भातील समस्या भेडसावतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्या-त्या राज्यांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात राज्य सरकार सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करावी​, यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
सरकारी इस्पितळांत कंत्राटी पद्धतीवर भरती सुरू
सरकारी इस्पितळांमध्ये डॉक्टर आणि इतर तज्ज्ञांची कमतरता भासू नये, यासाठी अशी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह (गोमेकॉ) इतर सरकारी इस्पितळांमध्ये डॉक्टर आणि इतर तज्ज्ञांची पदे कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.