गोवा पर्यटनाची बदनामी करण्यामागे चिनी टूलकिट

पर्यटनमंत्री रोहन खंवटे : मागील वर्षापेक्षा २१ टक्के पर्यटक अधिक


17 hours ago
गोवा पर्यटनाची बदनामी करण्यामागे चिनी टूलकिट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सोशल मीडियावर केली जात असलेल्या गोवा पर्यटनाच्या बदनामीच्या मागे चिनी टूलकिटचा हात असल्याचे दिसून आले आहे. परंतु या बदनामीवर विश्वास न ठेवता पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाले. मागील वर्षाच्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीच्या तुलनेत यंदा पर्यटकांच्या संख्येत २१ टक्क्यांची वाढ झाली आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर गोव्याच्या पर्यटनाची सुरू असलेल्या बदनामीच्या पार्श्वभूमीवर दोना पावला येथील ताज सिदादे गोवा या हॉटेलमध्ये सोमवारी पर्यटन भागधारकांची परिषद पार पडली. या परिषदेत पर्यटनाची दिशा ठरवण्यासाठी भागधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या. या सूचनांवर मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने कार्यवाही केली जाईल, असे पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले. परिषदेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पर्यटन संचालक सुनील अंचिपाका, टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे सदस्य उप‌स्थित होते.
गोवा पर्यटनाविषयीची चुकीची माहिती चायनिज इकोनॉमिक इन्फर्मेशन सेंटरमधून आली. ती कशी आली ते कळाले नाही. या चिनी टूलकिटवर विश्वास ठेवून अनेक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरनी आपला टीआरपी वाढवण्यासाठी गोवा पर्यटनाची बदनामी सुरू केली. त्याचवेळी आम्ही आकडेवारीसह उत्तर देण्याचे ठरवले होते; परंतु मुख्यमंत्र्यांनी ही बदनामी गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम करणार नाही. थोडा वेळ घेऊन नंतरच यावर बोलण्याचा सल्ला दिला. नाताळ आणि नूतन वर्षारंभ यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात आले. त्यामुळे हा हंगाम उत्तमरीत्या सुरू आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.
या परिषदेत क्रूझचे मालक, मोपा आणि दाबोळी विमानतळाचे संचालक, टॅक्सीमालक, होमस्टे आणि हॉटेलचे मालक, वॉटर स्पोर्ट्स आणि शॅकमालक यांच्याशी चर्चा करण्यात आली, असे पर्यटन संचालक सुनील अंचिपाका यांनी सांगितले.
विदेशी पर्यटकांमध्ये आतापर्यंत ३ टक्के वाढ
डिसेंबरनंतर मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या जानेवारी ते डिसेंबर या काळाच्या तुलनेत यंदा सुमारे २१ टक्के पर्यटक वाढले आहेत. तिमाहीचा विचार केला असता ही वाढ ३८ टक्क्यांवर पोहोचते. विदेशी पर्यटकांमध्ये ३ टक्क्यांची वाढ आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विदेशी पर्यटकांची दर दिवशी २०० विमाने गोव्यात दाखल होत होती, अशी माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.