२३२ पदांसाठी २२,०४५ अर्ज : आणखी तीन दिवस चार बॅचद्वारे होणार परीक्षा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : एलडीसीच्या २३२ पदांसाठी दोन दिवसांत साडेनऊ हजार उमेदवारानी परीक्षा दिली आहे. एलडीसीच्या २३२ पदांसाठी २२ हजार ४५ अर्ज आले आहेत. शनिवारी चार, तर रविवारी पाच केंद्रांवर परीक्षा झाली. आणखी तीन दिवस परीक्षा होणार आहे. कर्मचारी भरती आयोगाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली.
शनिनवारी ११ जानेवारी रोजी आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नोलॉजी (आसगाव), डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (फातोर्डा), रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड आर्टस (नावेली), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नोलॉजी (कुंकळ्ळी) या चार केंद्रांवर परीक्षा झाली. रविवार, १२ जानेवारी रोजी आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नोलॉजी (आसगाव), सेंट झेवियर (म्हापसा), डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (फातोर्डा), रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड आर्टस (नावेली), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नोलॉजी (कुंकळ्ळी) या पाच केंद्रांवर परिक्षा झाली. परीक्षेसाठी चार बॅच केल्या आहेत. सकाळी ९.१५ ते १०.३० पर्यंत पहिल्या बॅचसाठी परीक्षा झाली. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १२.४५ दुसरी बॅच, दुपारी २ ते ३.१५ तिसरी बॅच आणि सायं. ४.१५ ते ५.३० पर्यंत चौथ्या बॅचची परीक्षा झाली. यानंतर १८ जानेवारी, १९ जानेवारी आणि २५ जानेवारी या दिवशी परीक्षा होईल. परीक्षेच्या वेळा आधीसारख्याच असतील. ६० गुणांच्या परीक्षेसाठी ७५ मिनिटांचा वेळ असेल. परीक्षा पूर्ण होताच उमेदवारांना आपले गुण कळतील. परीक्षेच्या १५ मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. पहिल्या दिवशी, शनिवारी सेंट झेवियर (म्हापसा) केंद्रात परीक्षा झाली नाही. रविवारपासून पाचही केंद्रांवर परीक्षा होईल. १८ जानेवारीला सेंट झेवियर केंद्रात परीक्षा होणार नाही. अन्य चार केंद्रांवर परीक्षा होईल. १९ जानेवारीलाही पाचही केंद्रांवर परीक्षा होईल. २५ जानेवारीला एनआयटी (कुंकळ्ळी) आणि रोझरी (नावेली) या केंद्रांवर परीक्षा होणार नाही. अन्य केंद्रांवर नेहमीप्रमाणे परीक्षा होईल.
वर्ग असल्यामुळे शनिवारी म्हापशात परीक्षा नाही