युतीचा निर्णय निवडणूक जवळ आल्यानंतरच
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सध्या भाजप आणि मगोची युती आहे. विधानसभा निवडणूकही दूर आहे. त्यामुळे मगोच्या नेत्यांनी सार्वजनिक ठिकाणी वक्तव्ये करताना भान ठेवावे. विधानसभा निवडणूक युती करून लढवायची की नाही, याचा निर्णय निवडणूक जवळ आल्यानंतर भाजपचे श्रेष्ठी घेतील, असे राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दोन दिवसांपूर्वी, ‘आगामी विधानसभा निवडणूक भाजपशी युती करून लढू. आपले प्राधान्य प्रियोळ मतदारसंघाला असेल’, असे वक्तव्य केले होते. यावरून मंत्री तथा प्रियोळचे भाजप आमदार गोविंद गावडे यांनी, तीनवेळा निवडणूक हरलेल्यांनी आपला पक्ष भाजपसोबत सत्तेत असल्याचे लक्षात घेऊन वक्तव्ये करावीत, असा टोला दीपक ढवळीकर यांना लगावला होता. दरम्यान, याबाबत तानावडे यांना विचारले असता ते बोलत होते. सध्या भाजप-मगो युतीचे सरकार सत्तेत आहे. अशावेळी भाजप आमदार असलेल्या मतदारसंघांबाबत मगोच्या अध्यक्षांनी आताच वक्तव्ये करणे चुकीचे आहे. विधानसभा निवडणूक अजून दूर आहे. निवडणुकीत युती करायची की नाही, कुणी किती आणि कोणत्या जागा लढायच्या, याचा निर्णय निवडणूक जवळ आल्यानंतर भाजपचे श्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इतरांनाही संधी मिळायला हवी : तानावडे
प्रदेशाध्यक्षपदाला आतापर्यंत मी योग्य न्याय दिला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना आपण पुन्हा प्रदेशाध्यक्ष व्हावे, असे वाटते. परंतु, इतरांनाही प्रदेशाध्यक्ष होण्याची संधी मिळायला हवी, अशी माझी भूमिका आहे. या पदाच्या स्पर्धेत असलेले सगळेच पात्र आहेत. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही सदानंद शेट तानावडे यांनी नमूद केले.