भगीरथ शेट्ये : नववीसाठी मात्र दोन सत्र परीक्षा होणार
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : इयत्ता नववी आणि दहावीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) दोन सत्र परीक्षांची तरतूद असली तरीही हे धोरण लागू केल्यानंतर पहिल्या वर्षी मात्र इयत्ता दहावीसाठी एकच वार्षिक परीक्षा होईल. पहिल्याच वर्षी गोवा शालान्त मंडळाला दोन परीक्षा घेणे शक्य होणार नाही. धोरण लागू झाल्यानंतर पहिल्या वर्षी तरी एकच अंतिम परीक्षा घेण्याचा विचार आहे, असे शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सध्या नर्सरी आणि इयत्ता नववी या वर्गांना लागू झाले आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) इयत्ता तिसरी, सहावी आणि दहावी यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचा प्रस्ताव आहे. यंदा जे विद्यार्थी नववीत आहेत, ते पुढील वर्षी (२०२५-२६) दहावीत जातील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इयत्ता नववी आणि दहावीसाठी दोन सत्र परीक्षा घेण्याची तरतूद आहे. यंदा इयत्ता नववीसाठी दोन सत्र परीक्षा घेतल्या जातील. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शालान्त मंडळ काढणार आहे. दहावीची परीक्षा शालान्त मंडळ घेत आहे. वार्षिक एकच परीक्षा होते आणि त्या गुणांवरच आधारित निकाल जाहीर केला जातो. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इयत्ता नववी आणि दहावीसाठी दोन सत्र परीक्षा घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे दहावीसाठीही दोन सत्र परीक्षा घेण्याची आवश्यकता आहे. पहिल्याच वर्षी दोन परीक्षा घेणे शालान्त मंडळाला शक्य होणार नाही. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तरी दहावीसाठी एकच परीक्षा घेतली जाईल. धोरण लागू झाल्यानंतर पुढील वर्षापासून दोन परीक्षा घेण्याचा विचार केला जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीत किरकोळ बदल करण्याचे अधिकार राज्यांना आहेत. यंदा नववीची दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्चमध्ये घेतली जाईल. अद्याप वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये म्हणाले....
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत बैठका सुुरू आहेत.
बैठकीत शालान्त मंडळाने दहावीच्या अंतिम परीक्षेबाबतचे धोरण स्पष्ट केले आहे.
शालान्त मंडळ इयत्ता नववीसाठी सत्र परीक्षांच्या फक्त प्रश्नपत्रिका काढते.
उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासह निकाल लावण्याचे काम विद्यालये पार पाडत असतात.
पहिल्याच वर्षी दोन सत्र परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे आणि निकाल तयार करणे शालान्त मंडळाला शक्य होणार नाही.