सरकारकडे नोंदणी असलेल्याच खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करा !

गृह खात्याच्या अव्वल सचिवांकडून निर्देश जारी


13th January, 12:06 am
सरकारकडे नोंदणी असलेल्याच खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करा !

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यात मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात जमीन व्यवहार तसेच इतर प्रकरणात खासगी सुरक्षा रक्षक किंवा बाउन्सरचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन गृह खात्याने राज्यातील अनेक सरकारी तसेच खासगी आस्थापने, संघटनांनी खात्याकडे नोंदणी असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे सूचना जारी केले आहे. या संदर्भात गृह खात्याचे अव्वल सचिव मथन नाईक यांनी निर्देश जारी केले आहे.

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा काही भाग जून २०२४ मध्ये पाडण्यात आले होते. त्यावेळी संबंधितांनी खासगी बाउन्सरचा वापर केला होता. तसेच घरे खाली करणे, भूखंड बळकावणे, पबच्या सुरक्षेसाठी, घरफोड्या, खुनी हल्ले, धमक्या, खंडणी वसूल करणे अशा अनेक गोष्टी गोव्यात नेहमीच होतात. गोव्याच्या किनारी भागात तसेच बार्देश, पेडणे, तिसवाडी या तीन तालुक्यांमध्ये काही ठिकाणी गुंडांना बाऊन्सर असे गोंडस लेबल लावून आज त्यांच्यामार्फत दहशत माजवली जात आहेत. अश्या घटना काही वेळा समोर आल्यास त्याच्यावर पोलिसांमार्फत कारवाई केली जात आहेत. तर अनेकदा प्रकरण नंतर आपापसात मिटवण्यात येतात. याशिवाय अनेकदा गुन्हेगारी कारवायांत खासगी नोंदणी नसलेले सुरक्षा रक्षकांचा सहभाग येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांना संबंधितावर कारवाई करण्यास अडचण येत आहेत. याशिवाय काही शैक्षणिक संस्था, औद्यौगिक वसाहतीतील कंपनी, पर्यटन खात्याकडे निगडित असलेले व्यावसायिक तसेच इतर संस्था नोंदणी नसलेल्या खासगी सुरक्षा ठेवत असल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर गृह खात्याने निर्देश जारी करून गृह खात्याकडे नोंदणी असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश जारी केले आहे. राज्यात सुमारे १५६ खासगी सुरक्षा रक्षक एजन्सी नोंदणीकृत आहेत. याशिवाय गोवा मानव संसाधन विकास महामंडळ सरकारी संस्थांना सुरक्षा रक्षक देत आहेत. अशा संस्थांना वरील निर्देश लागू राहणार नाही. या प्रकरणी गृह खात्याने शिक्षण सचिव, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य सचिव, पर्यटन सचिव, आरोग्य सचिव, गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष, गोवा राज्य औद्योगिक संघटनाचे अध्यक्ष, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्षांना यांना पत्र लिहून सूचना केली आहे. याशिवाय वरील संस्थानांना त्याच्याशी निगडित असलेल्या सर्व आस्थापनांना गृह खात्याकडे नोंदणी असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे.