गोवा बोर्डाचा निर्णय; याआधी संपूर्ण पेपरसाठी होते शुल्क
पणजी : दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालानंतर पेपरची फेरतपासणी करावयाची असल्यास त्यांना प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी संपूर्ण पेपरच्या फेरतपासणीसाठी सातशे रुपये मोजावे लागत होते. परंतु, यावेळी मात्र प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती गोवा बोर्डचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
यंदा बारावीची परीक्षा १० ते २८ फेब्रुवारी या दरम्यान, तर दहावीची परीक्षा १ ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्याला मिळालेल्या गुणांवर नाखुश असतात. त्यांच्याकडून पेपरच्या फेरतपासणीची मागणी केली जाते. याआधी अशा प्रकारची मागणी आल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडून संपूर्ण पेपरसाठी सातशे रुपयांचे शुल्क आकारण्यात येत होते. परंतु, यावेळी मात्र प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपयांचे शुल्क घेण्याचा निर्णय गोवा बोर्डने घेतलेला आहे, असेही शेट्ये यांनी सांगितले.
दरम्यान, दहावी आणि बारावीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी निकालानंतर स्वत:ला मिळालेल्या गुणांवर संशय व्यक्त करत पेपरच्या फेरतपासणीची बोर्डाकडे मागणी करतात. त्यानुसार याआधी संबंधित विद्यार्थ्यांना संपूर्ण पेपरच्या तपासणीसाठीचे शुल्क बोर्डाला द्यावे लागत होते. परंतु, यावेळी मात्र शंका असलेल्या प्रश्नांच्या गुणांचीच तपासणी करून वेळ वाचवण्याच्या अनुषंगाने बोर्डाने नियमात बदल केला असल्याची माहिती गोवा बोर्डातील सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
अगोदर मागावी लागेल फोटोकॉपी!
पेपरच्या फेरतपासणीची मागणी करीत असताना विद्यार्थ्यांना प्रथम फोटोकॉपीची मागणी करावी लागेल. त्यानुसार चार ते पाच दिवसांत फोटोकॉपी देण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या प्रश्नाच्या गुणांबाबत संशय असेल, त्याची माहिती द्यावी लागेल. त्यासाठी विद्यार्थी आपल्या शिक्षकांचीही मदत घेऊ शकतात. त्यानुसार प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपयांचे शुल्क आकारून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रश्नांचीच फेरतपासणी करण्यात येईल, असेही भगीरथ शेट्ये यांनी नमूद केले.