पणजीत ड्रेनेज, रस्ते, झाडांचे मॅपिंग अंतिम टप्प्यात

स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची माहिती : भविष्यात शहर नियोजनासाठी होणार उपयोग


11 hours ago
पणजीत ड्रेनेज, रस्ते, झाडांचे मॅपिंग अंतिम टप्प्यात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडतर्फे पणजीतील ड्रेनेज, रस्ते, झाडे, वीज खांब, ट्रॅफिक सिग्नल्स, ट्रान्सफॉर्मर्स व इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स आदींचे मॅपिंग अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या सर्वेक्षणातून मिळालेला डेटा एकत्र करून शहराचा संपूर्ण डेटाबेस तयार केला जाईल. भविष्यात शहर नियोजनासाठी याचा उपयोग होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर हा डेटा सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी दिली.
स्मार्ट सिटीने जीआयझेडच्या सहकार्याने ‘अर्बन-अॅक्ट’ प्रकल्पाअंतर्गत हे सर्वेक्षण सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू केले होते. उपक्रमाद्वारे हवामान बदल आव्हानांना सामोरे जाण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मॅपिंग, संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत शहर नियोजनावर भर दिला जाणार आहे. यामध्ये शहराचा भूआकार, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे नेटवर्क, रस्ते व इतर सुविधांचे मॅपिंगचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
१:१००० या प्रमाणातील टोपोग्राफिकल (भूआकार) सर्वेक्षणासाठी ‘डीजीपीएस’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणासाठी पणजी शहरात २४ प्राथमिक सर्वेक्षण नियंत्रण बिंदू स्थापन करण्यात आले आहेत. यासाठी भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या कंटीन्यूअस रेफरन्स स्टेशनचा वापर करण्यात आला आहे. ड्रोनने हवाई सर्वेक्षण करून डिजिटल टेरेन मॉडेल (डीटीएम) व ऑर्थो रेक्टिफाइड प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत.
पणजीतील नाल्यांचा परिपूर्ण नकाशा लवकरच
सर्वेक्षणातून पणजीतील सांडपाण्याच्या व्यवस्थेचे मॅपिंग होत आहे. यामध्ये खुले व झाकलेले नाले, नाल्यांची रुंदी, त्यांची उच्चतम व निच्चतम पातळी, नाल्यांचा संगम बिंदू आदींचा समावेश आहे. याशिवाय शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडे, वीज खांब, ट्रॅफिक सिग्नल्स, ट्रान्सफॉर्मर्स व इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स यांची नोंदणीदेखील केली जात आहे. या प्रकल्पाच्या शेवटी पणजी शहरातील नाल्यांचा एक परिपूर्ण नकाशा तयार करण्यात येईल. भविष्यात नाल्यांवर करण्यात येणारे कोणतेही काम या वैज्ञानिक डेटाबेसच्या आधारेच केले जाईल, अशी माहिती स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी दिली.