आळशीपणा सोडा, नाहीतर नोकऱ्यांची संधी गमावाल !

मुख्यमंत्र्यांचा गोमंतकीयांना सल्ला : नेतृत्व गुण विकसित करण्याचेही आवाहन


20 hours ago
आळशीपणा सोडा, नाहीतर नोकऱ्यांची संधी गमावाल !

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील युवकांना सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी आहे. ती घेतली नाही तर पुढील दहा वर्षांत अन्य राज्यांतील व्यक्ती या संधी घेतली. गोमंतकीयांनी आळशीपणा सोडला पाहिजे. नाहीतर नोकरीच्या संधीपासून ते दूर जातील, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. सोमवारी गोवा विद्यापीठ आणि उच्च शिक्षण खात्यातर्फे आयोजित ‘यंग लीडर काॅन्क्लेव्ह’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खात्याचे संचालक भूषण सावईकर, अभाविपचे राष्ट्रीय संयोजक डॉ. वीरेंद्र सोळंकी, विद्यार्थी परिषदेचे अंशुल सिनारी व विनय राऊत उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात सध्या विविध क्षेत्रांत चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र केवळ सरकारी नोकरी हवी या आग्रहापाही या संधी गोमंतकीयांकडून घेतल्या जात नाहीत. अभियंता झालेली व्यक्ती एलडीसीची नोकरी मिळेल या आशेने घरी बसून आहे. एकदा गेलेली संधी पुन्हा येत नसते हे समजून घेतले पाहिजे. तुम्ही संधी घेतली नाही तर अन्य राज्यांतील व्यक्ती इथे येऊन त्या संधी घेतील. असेच होत राहिले तर पुढील दहा वर्षांत राज्यातील संधी संपून जातील. यासाठीच गोव्यातील तरुणांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले पाहिजे.
ते म्हणाले, आता तर गोव्यात राज्याबाहेरील एनजीओदेखील काम करत आहेत. एनजीओ क्षेत्रात चांगला निधी मिळतो. गोमंतकीयांनी स्वतःची एनजीओ सुरू करावी. तरुणांनी नेतृत्व गुण विकसित करणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व विकास, व्यासपीठावर बोलणे, सर्वांना घेऊन पुढे जाणे, असे गुण विकसित करावेत. स्वतःला विकसित केले तरच तुमचे गाव, राज्य आणि देश विकसित होईल. चांगला नेता हा कधीही स्वकेंद्रित असत नाही. त्याला आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे किंवा सामान्य ज्ञान असणे आवश्यक असते. चांगले नेतृत्व हे जन्माला येत नसते तर ते विकसित करावे लागते.
काही लोक आपण नेता म्हणून देशभर फिरतात. केवळ प्रत्येक भाषणात पुस्तक दाखवले म्हणून नेता तयार होत नसतो. चांगल्या नेतृत्वाने सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, पुस्तके वाचली पाहिजेत, असे झाले तरच ती व्यक्ती चांगला नेता होऊ शकते. आजच्या तरुणांनी ८० हजारांचे बूट किंवा एक लाखाचे घड्याळ, अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये. सर्वांनीच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आळशीपणाची मानसिकता सोडली पाहिजे!
मुख्यमंत्री म्हणाले की, पोर्तुगीजांनी ४५० वर्षांच्या कालावधीत गोवेकरांना आळशी बनवून ठेवले. गोवेकर म्हणजे सुशेगाद अशी ओळख झाली आहे. आपण पिढ्यान् पिढ्या आळशीपणाच्या मानसिकतेत अडकून बसलो आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी आपण कामात व्यग्र राहणे आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा ‘बिझी’ असता तेव्हा तुम्ही ‘लेझी’ असत नाही.
राज्यात मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव
मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबाबत नियोजनाच्या टप्प्यावर काम सुरू आहे. याबाबत आम्ही प्रस्ताव तयार करत आहोत. तसेच भारतीय रेल्वे व अन्य केंद्रीय खात्यांसोबत चर्चा सुरू आहेत. पुढील काही काळात मेट्रो रेल्वे गोव्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.