प्रश्नाला शंभर रुपये घेण्याचा निर्णय गोवा बोर्डाकडून मागे

दहावी, बारावीच्या फेरतपासणीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच


17 hours ago
प्रश्नाला शंभर रुपये घेण्याचा निर्णय गोवा बोर्डाकडून मागे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दहावी आणि बारावीच्या पेपर फेरतपासणीसाठी प्रत्येक प्रश्नाला शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय सोमवारी मागे घेत, यंदा पूर्वीप्रमाणेच फेरतपासणी होणार असल्याचे परिपत्रक गोवा बोर्डाने जारी केले आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालानंतर पेपरची फेरतपासणी करावयाची असल्यास बोर्डाकडून संपूर्ण पेपरसाठी ७०० रुपयांचे शुल्क घेतले जात होते. यंदा मात्र फेरतपासणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येक प्रश्नासाठी शंभर रुपये घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता. परंतु, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पालकावर आर्थिक भार पडणार असल्याची चिंता शिक्षण संस्थांच्या प्रमुखांकडून व्यक्त होण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच बोर्डाने यंदा पेपर फेरतपासणीची पूर्वीचीच पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे बोर्डाचे सचिव विद्यादत्त नाईक यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, पेपरच्या फेरतपासणीची मागणी करत असताना विद्यार्थ्यांना प्रथम फोटोकॉपीची मागणी करावी लागेल, अशी अटही बोर्डाने घातलेली होती. ही अटही आता मागे घेण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरवर्षी मिळतो सुमारे ११ लाखांचा महसूल
दरवर्षी दहावीतील सुमारे ७००, तर बारावीचे सुमारे ९०० विद्यार्थी परीक्षांच्या निकालानंतर पेपर फेरतपासणीसाठी गोवा बोर्डाकडे अर्ज करतात. त्यातून बोर्डाला प्रत्येक वर्षी सुमारे ११ लाखांचा महसूल प्राप्त होतो, अशी माहिती गोवा बोर्डाच्या सूत्रांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.